मतिमंद विद्यार्थ्यांना मायेची ऊब
By Admin | Updated: December 20, 2015 00:24 IST2015-12-20T00:24:10+5:302015-12-20T00:24:10+5:30
थंडीची लाट मागील आठ दिवसापासून सुरु झाली. सर्वांनीच ऊनी स्वेटर्स कपाटातून काढले.

मतिमंद विद्यार्थ्यांना मायेची ऊब
विद्यार्थी गहीवरले : उपविभागीय अधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम
मोहन भोयर तुमसर
थंडीची लाट मागील आठ दिवसापासून सुरु झाली. सर्वांनीच ऊनी स्वेटर्स कपाटातून काढले. तुमसरातील एका खासगी विना अनुदानित मतिमंद शाळेतील विद्यार्थी जुन्या स्वेटर्सनीच ऊब मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. तुमसरच्या महिला उपविभागीय अधिकाऱ्यांनी मातृत्वाची ऊब देत मतिमंद मुलांना शाळेत जाऊन स्वेटर वितरित केले. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
तुमसरातील दुर्गा कॉलनीत लुंबिनी मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे. या शाळेत सुमरे ५० विद्यार्थी असून ते जन्मानेच मतिमंद आहेत. यात गरीब विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. राज्य शासनाने या शाळेला अजूनपर्यंत अनुदान दिले नाही. स्वखर्चाने येथील संचालकाने शाळा चालविण्याने व्रत स्वीकारले आहे. सध्या थंडीची लाट सुरु झाली. येथील विद्यार्थ्यांकडे जुने ऊनी स्वेटर्स होते, काहींचे स्वेटर्स फाटले होते.
उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांना याची माहिती मिळताच त्यांनी या ५० विद्यार्थ्यांकरिता सुमारे २० हजारांचे स्वेटर्स घेऊन त्या मतिमंद शाळेत पोहचल्या. शाळा संचालक नयन भुतांगे यांना प्रथम आश्चर्याचा धक्काच बसला. मतिमंद विद्यार्थ्यांची सोनुले यांनी आस्थेने विचारपूस केली. सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार स्वेटर्स त्यांनी वितरीत केले.
प्रथम या विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांचे स्वागत केले. त्यांचे आदरातिथ्य पाहून सोनुले भारावून गेल्या. यापूर्वी सोनुले यांनी या शाळेला भेट देऊन खाद्यपदार्थ वाटप केले होते.
स्वेटर्स वितरित करताना त्यात मायेची ऊब प्रकर्षाने जाणवत होती. या मातृत्वाचा प्रेमाचा झऱ्याचे विद्यार्थ्यांसह उपस्थित शिक्षक शिक्षिकांनाही अनुभव आला. सुमारे दोन तास उपविभागीय अधिकारी सोनुले यांनी शाळेत घालविले. या विद्यार्थ्यांना स्पष्ट बोलता येत नाही. परंतु त्यांच्या देहबोलीतून त्यांना निश्चितच अत्यानंद झाला होता. याप्रसंगी शाळा संचालक नयन भुतांगे, मुख्याध्यापिका ममता बांगरे, सचिन मेश्राम, शिक्षिका नीता दमाहे, प्रीती रिनायत, पंडेले, दिनेश देशभ्रतार, दिनेश भुतांगे, सचिन बांगरे, कृष्णा रोकडे, नरेंद्र थोटे उपस्थित होते.