शहराला लागून असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सीमेचा विषय अनेक वर्षांपासून कायम आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या डावीकडील बराच भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याचे भासत असले तरी, तो नगरपरिषदेच्या क्षेत्रात येतो. नागपूर नाका, सोनकुसरे अपार्टमेंट परिसर, गणपती रेसिडन्सी, पाटीदार भवन परिसर, तकिया वाॅर्ड, बँक ऑफ महाराष्ट्र, अखिल सभागृह, पेट्रोल पंप हा भाग नगरपरिषदेच्या मंजूर विकास आराखड्यात समाविष्ट आहे. यापूर्वी झालेल्या प्रभाग रचनेत हा भाग नगरपरिषद क्षेत्रातच दर्शविला आहे. या भागाची जनगणना सुध्दा नगरपरिषदेच्या हद्दीत झाली आहे, अशा अनेक गोष्टींचा या बैठकीदरम्यान उलगडा केला. ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड रचना नकाशात हा भाग वगळण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या १९५९ च्या नोटिफिकेशनमध्ये याचा समावेश असल्याने हा भाग पालिकेच्या हद्दीत येतो, हे उघड झाले आहे.
खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, तहसीलदार विमल थोटे, नगरपरिषद मुख्याधिकारी विनोद जाधव, खंडविकास अधिकारी नूतन सावंत, सहायक नगररचनाकार मुकेश कापसे, निखिल कामडी, अनिकेत दुरगवडे, सरपंच मनीष गणवीर, तलाठी गोस्वामी यांच्या समक्ष हे क्षेत्र पालिकेचे असल्याचे निदर्शनास आल्याने आता अनेक वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद निकाली निघणार आहे.