दोघांना आजन्म कारावास
By Admin | Updated: August 17, 2014 22:58 IST2014-08-17T22:58:37+5:302014-08-17T22:58:37+5:30
जुन्या वैमनस्यातून तामसवाडी येथील प्रमोद राधेश्याम कोहपरे (२४) याचा २०१३ मध्ये खून करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश शाम चव्हाण यांनी रणजित घनश्याम कोहपरे

दोघांना आजन्म कारावास
प्रकरण तामसवाडीतील खुनाचे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
भंडारा : जुन्या वैमनस्यातून तामसवाडी येथील प्रमोद राधेश्याम कोहपरे (२४) याचा २०१३ मध्ये खून करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश शाम चव्हाण यांनी रणजित घनश्याम कोहपरे (२१) व क्रिष्णा हरिराम इखार (२३) या दोघांना एक हजार रुपये दंड व आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील प्रमोद कोहपरे याचे रणजित कोहपरे व क्रिष्णा इखार यांच्याशी घटनेच्या वर्षभरापूर्वी क्षुल्लक कारणावरून शाब्दीक बाचाबाची व धक्काबुक्की झाली होती. याचा वचपा काढण्याचा बेत या दोघांनी आखला होता.
२५ मार्च २०१३ ला मृतक प्रमोद कोहपरे हा तामसवाडी कर्कापूर मार्गावरील हनुमान मंदिराजवळील शेताकडे सायंकाळच्या सुमारास गेल्याची माहिती रणजित व क्रिष्णा यांना मिळाली.
यावरून दोघांनीही धारदार शस्त्रासह त्याचा पाठलाग केला. त्याला एकटा असल्याचे बघून दोघांनीही त्याची वाट अडविली.
यावेळी तिघांमध्ये हातापाई झाली व त्याला जमिनीवर पाडले. रणजितने मृतक प्रमोदचे हातपाय पकडून ठेवले व क्रिष्णाने त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले व यातच तो गतप्राण झाला.
ही घटना लाला गोविंदा पांडे व रमेश इसरू उके यांनी बघितली. सदर घटनेची माहिती त्यांनी मृतकाच्या वडीलांना दिली. पोलिसांना घटनेची माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर गाडामोडे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र बनवून न्यायदानासाठी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश शाम चव्हाण यांच्या न्यायालयात प्रकरण सादर केले.
याप्रकरणी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मा यांनी साक्ष पुरावे तपासले. यात रणजित कोहपरे व क्रिष्णा इखार या दोघांनीही खून केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना एक हजार रुपये दंड व आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाकडून अॅड.शाम चव्हाण यांनी युक्तीवाद केला. तर आरोपीकडून अॅड.स्वामी यांनी बाजू मांडली. तुमसर पोलीस ठाण्याचे नायक पोलीस शिपाई राजू भोंगाडे यांनी युक्तीवाद अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)