राज्यातील मॉडेल ठरणार भंडारा जिल्हा परिषदमधील बीओटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:50+5:302021-04-08T04:35:50+5:30

८ कोटी ७५ लक्ष रूपयांचे बांधकाम करून मिळणार भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत जुनी जनपद म्हणजेच जुनी ...

BOT in Bhandara Zilla Parishad will be the model in the state | राज्यातील मॉडेल ठरणार भंडारा जिल्हा परिषदमधील बीओटी

राज्यातील मॉडेल ठरणार भंडारा जिल्हा परिषदमधील बीओटी

८ कोटी ७५ लक्ष रूपयांचे बांधकाम करून मिळणार

भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत जुनी जनपद म्हणजेच जुनी जिल्हा परिषद ही जागा व लाल बहाद्दुर शास्त्री शाळेच्या सुरक्षा भिंती लगतची जागा बीओटी म्हणजेच बांधा, वापरा व परत करा. या तत्वावर देण्यासाठी भंडारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला. महाराष्ट्रातील हा असा मॉडेल प्रकल्प तयार होणार आहे की, या माध्यमातून ३ कोटी ५४ लक्ष रूपये नगदी स्वरूपात जिल्हा परिषदेला मिळणार व ८ कोटी ७५ लक्ष रूपयांचे बांधकाम विकासकाकडून मिळणार आहे.

या बीओटी प्रकल्पाअंतर्गत जिल्हा परिषदला इमारती बांधकाम व प्रत्यक्ष निधी पकडून ११ कोटी ६९ लक्ष रुपयाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या सर्व कायदेशीर बाबी सोपस्कर केल्यानंतर त्याचे नुकतेच भूमिपूजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष आ.नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जि.प.उप मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन पानझडे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता घरडे तसेच माजी जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी बरेच मान्यवर उपस्थित होते.

मॉडेल हा बीओटी मॉडेल राज्यात याकरीता मॉडेल म्हणून ठरणार. या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न जिल्हा परिषदेला देण्याचा मानस आहे. या माध्यमातून जुनी खंडर पडलेली इमारत सुस्थितीत तयार होईल व जिल्हा परिषदेला हस्तांतरित केली जाईल. एका टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून निविदा मागवून प्रभात डेव्हलपर्सला विकासक म्हणून काम देण्यात आलेले आहे. जनपदमध्ये १ कोटी ८५ लक्ष रूपयांचे बांधकाम लाल बहाद्दुर शाळेच्या आवारात ४ कोटी ७५ लक्ष रूपयांचे गाळे बांधून मिळतील व ते जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात येतील. त्यानंतर विकासक ९५ लक्ष रूपयांचे बचतगट हॉल बांधून देईल. बचतगटाच्या माध्यमातून निर्मित वस्तूंची विक्री व प्रदर्शनी यातून चालण्यास मदत होईल. तिसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे अनेक वर्षापासून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेकरीता निवासाची सोय नाही. त्यांना खाजगी भाड्याने इमारत घ्यावी लागत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकरीता दोन बंगले बांधून मिळतील. या सोबतच हस्तांतरीत झालेल्या गाळ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला किरायासुद्धा मिळणार आहे. हा करार ३० वर्षानंतर संपुष्टात येईल. म्हणजेच बांधा,वापरा आणि हस्तांतरित करा. अशा माध्यमातून शासनाचा पैसा खर्च न होता उत्पन्नात भर पडेल. या माध्यमातून अनेक इमारती बांधून मिळतील व यात शहराचे सुशोभीकरण होणार आहे दुकानांचे गाळे तयार झाल्यामुळे उद्योगधंद्यांना, बेरोजगारांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यवसायिक गाळे उपयुक्त ठरतील. म्हणून हा प्रकल्प महाराष्ट्रात मॉडेल म्हणून गणला जाईल असे बोलले जात आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्याकरता राज्य सरकार कडून मान्यता घेण्यात आली त्यानंतरच या प्रकल्पाला ओपन टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून विकासक नेमण्यात आले.

बॉ्क्स

शहराच्या सुशोभीकरणासाठी मदत - नाना पटोले

आतापर्यंतचे बीओटी प्रकल्प हे विकासकांना फायदा करून देणारे होते. पण या बीओटी प्रकल्पाच्या माध्यमातून शहराच्या सुशोभीकरण सोबतच जिल्हा परिषद ला आर्थिक महसूल व सुसज्ज अशा इमारती मिळणार आहेत. निश्चितच हा प्रकल्प महाराष्ट्रात मॉडेल प्रकल्प म्हणून गणला जाईल, असे उद्गार भूमिपूजन याप्रसंगी नाना पटोले यांनी व्यक्त केले.

Web Title: BOT in Bhandara Zilla Parishad will be the model in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.