बुकिंग भंडाऱ्यात, हब गोंदियात स्पीड पोस्टच्या पत्रांचा २०० किमीचा फेरा आठवडाभरानंतर मिळतो लिफाफा, ग्राहक मेटाकुटीला
By Admin | Updated: February 17, 2015 01:04 IST2015-02-17T01:04:31+5:302015-02-17T01:04:31+5:30
भंडारा ग्राहकाशी पत्रव्यवहार त्वरीत करता यावा, यासाठी डाक विभागाने 'स्पीड पोस्ट' सुविधा सुरू केली. मात्र,

बुकिंग भंडाऱ्यात, हब गोंदियात स्पीड पोस्टच्या पत्रांचा २०० किमीचा फेरा आठवडाभरानंतर मिळतो लिफाफा, ग्राहक मेटाकुटीला
प्रशांत देसाई
भंडारा ग्राहकाशी पत्रव्यवहार त्वरीत करता यावा, यासाठी डाक विभागाने 'स्पीड पोस्ट' सुविधा सुरू केली. मात्र, भंडारा प्रधान डाक घरातून पाठविलेल्या अतितातडीच्या पत्रांचा प्रवास हा २०० किमीचा फेरा पूर्ण करून होतो. कदाचित यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. स्पीड पोस्टचे हब हे भंडारा येथे नाही. त्यामुळे ती डाक गोंदियाला पाठवावी लागते. स्पीड पोस्टचा प्रवास रेल्वेमार्गे गोंदिया व तेथून बसमार्गे जिल्ह्यातील ग्राहकांपर्यत असा होत असल्याने ग्राहक मेटाकुटीस आला आहे. सर्वसाधारण डाक सेवेला पर्याय म्हणून डाक विभागाने स्पीड पोस्टची व्यवस्था केलेली आहे. भंडारा प्रधान कार्यालयातून दिवसाला शेकडो पत्रव्यवहार स्पीड पोस्ट माध्यमातून होते. स्पीड पोस्टचे मुख्य हब गोंदिया येथे असल्याने ग्राहकांना एका दिवसात मिळणारे पत्र आठवडाभरानंतर मिळते. आधुनिक युगात मोबाईल, संगणक व इंटरनेटची सुविधा आली असली तरी, पत्रव्यवहाराचे महत्व आजही कायम आहे. भारतीय डाक विभाग स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत ही सेवा नागरिकांना देत आहे. स्पर्धेच्या युगात डाक विभाग मागील काही वर्षात ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. याच अनुषंगाने, या विभागाने साधारण डाकेत लिफाफा पोहचण्यात विलंब होत असल्याने स्पीड पोस्टची सुविधा सुरू केली. भंडारा हे जिल्हास्थळ असल्याने येथील प्रधान डाक कार्यालयातून दररोज सरासरी १०० ते १५० लिफाफ्यांची स्पीड पोस्ट करण्यात येते. यासह आरटीओ कार्यालयातील आरसीबुक व वाहन चालविण्याचा परवाना आता डाक विभागातून पाठविण्यात येत आहे. एलआयसीनेही त्यांच्या ग्राहकांना विम्याचा भरणा करण्याची माहिती व्हावी, यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. अशा 'बल्क कस्टमर'चे ५०० ते १,००० लिफाफे वाटपाची जबाबदारी स्पीड पोस्टच्या माध्यमातून आहे. स्पीड पोस्टचा लिफाफा ग्राहकाला दुसऱ्या दिवशी मिळणे गरजेचे आहे. मात्र, स्पीड पोस्टचे हब भंडारा येथे नाही. ते गोंदिया येथे असल्याने भंडारा येथून स्पीड पोस्टचे पार्सल गोंदियाला रेल्वेमार्गे पाठविले जाते. तिथे नोंदणी झाल्यानंतर ग्राहकांना ते पत्र वितरीत करण्यासाठी एसटी बसने पाठविल्या जाते. यासाठी स्पीडसेवा असलेल्या लिफाफ्यांची डाक २०० किमीचा फेरा घेऊन ग्राहकांपर्यंत पोहचतो. जिल्ह्यातील ग्राहकाला ही डाक मिळण्यासाठी आठवडाभराचा अवधी लागतो. लिफाफा त्वरीत प्राप्त व्हावा, यासाठी अनेक ग्राहक स्पीड पोस्ट सेवेकडे वळले आहेत. अतिमहत्वाची सेवा म्हणून स्पीड पोस्टकडे बघितले जात असले तरी, लिफाफा त्वरीत मिळण्याऐवजी आठवडा लागत असल्याने ग्राहक मेटाकुटीस आले आहे. प्रधान कार्यालयांतर्गत जिल्ह्यात १८ उप कार्यालय व १२० शाखा कार्यालय आहेत. स्पीड हब गोंदिया येथे असल्याने ग्राहकांना पत्र मिळण्यासाठी त्रास होत आहे. याबाबत नागपूरचे पोस्ट मास्टर जनरल यांच्या माध्यमातून प्रवर अधिक्षकांना ग्राहकांच्या होत असलेल्या असुविधांची माहिती दिली आहे. - अविनाश अवचट, पोस्ट मास्टर, प्रधान डाक घर, भंडारा.