बंधपत्रित अधिपरिचारिकांची मानसिक पिळवणूक !
By Admin | Updated: June 9, 2016 00:42 IST2016-06-09T00:42:43+5:302016-06-09T00:42:43+5:30
रूग्णसेवेसाठी आरोग्य विभागाने बंधपत्रित सेविकांना शासकीय सेवेत घेतले. यावेळी त्यांच्याकडून बंधपत्र करण्यात आले.

बंधपत्रित अधिपरिचारिकांची मानसिक पिळवणूक !
नियमित सेवेपासून वंचित : विभागातील २५० सेविकांवर अन्याय
भंडारा : रूग्णसेवेसाठी आरोग्य विभागाने बंधपत्रित सेविकांना शासकीय सेवेत घेतले. यावेळी त्यांच्याकडून बंधपत्र करण्यात आले. सध्या नागपूर विभागात सुमारे २५० अधिपरिचारिका कार्यरत आहेत. मात्र त्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यात आले नसल्याने त्यांची मानसिक पिळवणूक होत आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत बंधपत्रित कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. नागपूर विभागातील बंधपत्रित अधिपरिचारिकांनी सदर कालावधी पूर्ण केलेला आहे. काहींना दहा ते वीस वर्षांचा कालावधी होत आहे. त्यांनी काम केल्याचे प्रमाणपत्रसुध्दा संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. यासंदसर्भात आस्थापनेमार्फत उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले. परंतु संबंधित विभागाने बंधपत्रित कालावधी नमूद न केल्यामुळे सेवा नियमाचा प्रस्ताव २००४ मध्ये पूर्ण करूनही सेवा नियमित करण्यात आलेली नाही. त्यामुळे सेवा नियमित प्रमाणपत्र अद्यापर्यंत बहुतेकांना मिळाले नाही. यात गोंदिया व भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत ३० पेक्षा अधिक अधिपरिचारिकांचा समावेश आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार बंधपत्रित उमेदवारांना त्यांच्या ठराविक सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील इतर विभागात नियमित सेवेचे आदेश देण्यात आले. परंतु नागपूर विभागात अधिपरिचारिकांबाबत १७ ते १८ वर्षांचा कालावधी होऊनही नियमित सेवेचे आदेश देण्यात आलेले नाही. अलीकडे नियमात झालेल्या बदलामुळे सेवा नियमिततेचे आदेश नसल्यामुळे अधिपरिचारिकांना उच्च शिक्षण तसेच पदोन्नतीसारख्या अनेक लाभांपासून वंचित रहावे लागत आहे.
अधिपरिचारिकांवर शासन कोट्यवधींचा खर्च करीत आहे. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नर्सेसनी शासनाची कमीतकमी दोन वर्ष सेवा करावी म्हणून त्यांचेकडून बंधपत्र लिहून घेतले जाते.
बंधपत्रित कालावधी संपल्यानंतर ज्यांना सेवेत रहावयाचे असेल त्यांच्या सेवा नियमित करण्यात याव्यात, असे आरोग्य महासंचालकांनी १० सप्टेंबर २०१३ च्या पत्रान्वये सर्व आरोग्य सेवेतील उपसंचालकांना कळविले आहे. परंतु आरोग्य उपसंचालकांनी बंधपत्रित अधिपरिचारिकांना सेवेत कायम न करून आरोग्य विभागाच्या महासंचालकांच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
या संदर्भात अधिपरिचारिकांनी अनेकवेळा वरिष्ठांकडे दाद मागितली. परंतु अद्यापही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे सर्व लाभ तसेच वेतन श्रेणीवाढ या अखंडित सेवेत असणाऱ्या अधिपरिचारिकांना देण्यात येते. आरोग्य सेवेत अस्थायी पदभरतीला सुरूवात झाल्यामुळे त्या सेवा नियमित होण्याच्या आदेशाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. एकीकडे अत्यावश्यक समजल्या जाणारी आरोग्य विभागातील आरोग्य सेवा महत्वाची मानली जाते. तर दुसरीकडे सुमारे २० वर्षापासून ही सेवा बंधपत्रित अधिपरिचारिका म्हणूनच देण्यात येत आहे. नियमित सेवेचे आदेश नसल्यामुळे अधिपरिचारिकांना उच्च शिक्षणासाठी प्रतिनियुक्ती व नियमित नियुक्तीपासून वंचित रहावे लागले आहे. (शहर प्रतिनिधी)