बोगस बांधकामात अधिकारी सहभागी
By Admin | Updated: October 21, 2015 00:38 IST2015-10-21T00:38:42+5:302015-10-21T00:38:42+5:30
आठ वर्षांपूर्वी झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी मुंबईहून चौकशी समिती आली होती.

बोगस बांधकामात अधिकारी सहभागी
सेवक वाघायेंचा आरोप : प्रकरण सार्वजनिक बांधकाम विभागातील बनावट कामांचे
भंडारा : आठ वर्षांपूर्वी झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी मुंबईहून चौकशी समिती आली होती. या समितीने आपल्या बोलाविले असता आपण त्यांना या कामांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. परंतु कार्यकारी अभियंता यांच्या काळातील कामांची चौकशी लावल्यामुळे त्यांनी हाताखालच्या अभियंत्याला हाताशी धरुन आपल्याविरुद्ध कट रचला, असा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.
यावेळी ते म्हणाले, मी आमदार साकोली विधानसभा क्षेत्रात खूप मंजूर कामे केली होती. या भागात झालेल्या चुकीच्या कामाची आपण चौकशी लावली होती. त्यावेळी उगले समितीने कामांची पाहणी करुन अहवाल दिला होता. त्यामुळे अनेकांच्या कामांची देयके निघाली होती. त्यानंतर पुन्हा दोनवेळा चौकशी समिती आली होती. त्यांनीही चौकशी केली. दरम्यान, शनिवारला आलेल्या चौकशी समितीला आपण त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी केली तर ते अधिक सोयीचे होऊ शकते, असेही सुचविले. त्यानुसार चौकशी समितीने दोन तीन अधिकाऱ्यांना बोलाविले. असे असताना आपण फसले जावू या भीतीने कार्यकारी अभियंत्यांनी माझ्यावर सुड उगविण्यासाठी हा प्रकार रचल्याचा आरोपही वाघाये यांनी केला.
उपविभागीय अभियंता कामडी हे चांगले अधिकारी असून ते आपल्या परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्याशी अव्यवहार्य बोलण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यावेळी मी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात सोसायटींनी कामे केलेली असल्यामुळे त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले पाहिजे, अशी आपली भावना होती आणि ती आजही आहे. या विभागातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे, अशी मागणी करुन कार्यकारी अभियंता हेमंत गाणार यांच्या काळातील कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या चौकशीमुळे चिडून त्यांनी हा माझ्याविरुद्ध कट रचला आहे. साकोली तालुक्यात ज्या १० कामांचे बनावट देयके गाणार यांनी काढली त्या कामांची यादी येत्या चार दिवसात माध्यमांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला जिल्हा परिषद सभापती नीळकंठ टेकाम, जिल्हा परिषद सदस्य नीळकंठ कायते, भाऊराव गिलोरकर, काँग्रेसचे साकोली तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
कनेरी-मोगरा आणि मरेगाव येथील पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे या कामाची कुणीही चौकशी केली तरीही कामाचा दर्जा दिसून येईल. अशा कामांचे बिले देता येऊ शकणार नाही. आपल्या कार्यकाळात चुकीची कामे केली असा कुणाचा आरोप असेल तर त्याची चौकशी व्हावी, त्यासाठी आपण तयार आहे.
-हेमंत गाणार,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भंडारा.
धनादेश काढले आणि रद्द केले
यावेळी सुशिक्षित अभियंता संघटनेचे उमेश कठाणे म्हणाले, अधीक्षक अभियंतास्तरावर लोहारा-पाथरी आणि कनेरी-मोगरा पुलाची निविदा निघाली होती. ते काम आपल्याला मिळाले. कामे स्लॅबलेवलपर्यंत आली त्यामुळे बील निघाले. परंतु कार्यकारी अभियंता गाणार यांनी कामाचा दर्जा योग्य नसल्याचे सांगत काढलेले धनादेश रद्द केले. काम निकृष्ट होते तर त्याचवेळी पत्र देण्याची गरज होती. परंतु तसे न करता माझे बिल मुद्दाम न काढल्याचा आरोपही कठाणे यांनी केला. ही कामे करीत असताना मजुरांना द्यावे लागणारे पैसे स्वत:ची चार एकर जमिन विकून द्यावे लागले. गणार हे कंत्राटदारांच्या जीवाशी खेळतात असाही आरोप कठाणे यांनी केला. कठाणे यांच्यासारख्या सुशिक्षीत अभियंत्यांनी केलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट ठरवून त्यांना देयके दिली नाही, त्यामुळे त्यांना जमिन विकावी लागली. आता कठाणे यांना बिल मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे सेवक वाघाये यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.