‘तो’ मृतदेह महालगाव येथून बेपत्ता तरुणीचा तर नव्हे !
By Admin | Updated: December 13, 2014 22:33 IST2014-12-13T22:33:35+5:302014-12-13T22:33:35+5:30
मागील आठवड्यात ५ डिसेंबर रोजी सुरेवाडा जंगलात एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्याच दिवशी साकोली तालुक्यातील महालगाव (सुकळी) येथून २१ वर्षीय तरूणी बेपत्ता झाली होती.

‘तो’ मृतदेह महालगाव येथून बेपत्ता तरुणीचा तर नव्हे !
भंडारा : मागील आठवड्यात ५ डिसेंबर रोजी सुरेवाडा जंगलात एका महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्याच दिवशी साकोली तालुक्यातील महालगाव (सुकळी) येथून २१ वर्षीय तरूणी बेपत्ता झाली होती. त्यामुळे या दोन्ही घटनेतील महिला एकच तर नसावी ना? याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला आहे.
मुंबई मालाड येथील दीपाली हरिभाऊ काळे ही २१ वर्षीय तरुणी महालगांव येथील सागर हटकर यांच्याकडे पाहुणी म्हणून आली होती. ५ डिसेंबर रोजी ती सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास फिरायला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र त्यानंतर ती घरी परत आली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर दीपाली काळे ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार साकोली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोंडउमरी पोलीस चौकीत करण्यात आली. मुंबईची तरुणी गावखेड्यातून बेपत्ता झाल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ५ डिसेंबरला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुरेवाडा येथील शंकरपटाच्या मैदानावर एक महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. बेपत्ता झालेली ही युवती अद्याप सापडलेली नाही. आणि जळालेल्या महिलेबाबतही पोलिसांना कुठलिही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे जळालेला तो मृतदेह हा महालगाव येथून बेपत्ता झालेल्या युवतीचा तर नसावा ना?, याबाबत शंकांना पेव फुटले आहे.
याबाबत साकोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कारधा पोलीस ठाण्यांतर्गत मिळालेला मृतदेह ‘त्या’ युवतीचा आहे. तर कारधाचे ठाणेदार राजेश शेट्टे हे जळालेल्या महिलेसंबंधी बेपत्ता तक्रारींची शहानिशा केली. मात्र वैद्यकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बेपत्ता झालेल्या युवतीशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत आहेत. (शहर प्रतिनिधी)