15 bhph33
अड्याळ( भंडारा) : पवनी तालुक्यातील कलेवाडा शेतशिवारात असलेल्या एका खासगी विहिरीत दोन बिबटे मृतावस्थेत आढळले. ही घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीला आली. या घटनेने खळबळ उडाली असून, घटनास्थळी जिल्हा उपवनसंरक्षक यांच्यासह वन विभागाचा फौजफाटा दाखल झाला. एकाचवेळी दोन बिबटे मृतावस्थेत आढळल्याने शिकारीची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, सोमवारी सकाळी कलेवाडा येथील सरस्वता ज्ञानेश्वर घोगरे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत दोन बिबटे मृतावस्थेत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. ही माहिती कलेवाडा येथील माजी सरपंच मोहन घोगरे यांनी वनाधिकाऱ्यांना दिली. विहिरीतून दोन्ही बिबट्यांचे मृतदेह वन कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने वर काढण्यात आले. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक एस. बी. भलावी व अन्य अधिकाऱ्यांना दिली. डीएफओ भलावी यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक विनोद पंचभाई घटनास्थळी पोहोचून स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक वनसंरक्षक नागुलवार, गडेगाव येथील प्रकाष्ट निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, साकोली येथील सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड, पवनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल जाधव, भंडाराचे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, फिरत्या पथकाचे संजय मेंढे यांच्यासह बचाव पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब, शहीद खान हेसुद्धा घटनास्थळी पाहणी करायला आले.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके, डॉ. अनु वराटकर, डॉ. विठ्ठल हटवार, डॉ. देविदास रेहपाडे यांच्या चमूने बिबट्याचे शवविच्छेदन केले. दोन्ही बिबटे नर असून, त्यातील एकाचे वय ४ ते ५ वर्ष असून, दुसरा बिबट्या हा ८ वर्षांचा असल्याचे सांगण्यात येते. विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाला असला तरी नेमका कशामुळे त्यांचा मृत्यू झाला, हे अहवालाच्या प्राप्तीनंतर कळणार आहे. दरम्यान, प्राथमिक चौकशीत त्यांच्यावर विषबाधेचा प्रयोग करण्यात आला काय, असा कयासही बांधला जात आहे.
बॉक्स
नमुने प्रयोगशाळेत पाठविले
कलेवाडा शिवारातील विहिरीत दोन बिबटे मृतावस्थेत आढळले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. तरुण अवस्थेतील दोन बिबटे मृतावस्थेत आढळल्याने त्यांची शिकार तर झाली नसावी, असाही अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यासाठी काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यासंदर्भात वनाधिकारी पुढील तपास करीत आहेत.
कोट बॉक्स
दोन्ही बिबटे थोड्या थोड्या अंतराने मरण पावले असावेत, असा आमचा अंदाज आहे. दोन्ही बिबटे कुजलेल्या अवस्थेत असून, त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा. बिबट्यांची काही नखे गायब आहेत. प्राथमिक निकषांवरून विष प्रयोगामुळे बिबट्यांचा मृत्यू तर झाला असावा, यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दोन्ही बिबट्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे प्रयोगशाळेच्या अहवाल प्राप्तीनंतर कळेल.
डॉ. गुणवंत भडके, पशुवैद्यकीय अधिकारी, ता. लाखनी.