तोंडखुरी, पायखुरीने पशुधन संकटात
By Admin | Updated: December 5, 2015 00:40 IST2015-12-05T00:40:20+5:302015-12-05T00:40:20+5:30
हिवाळ्याची चाहूल लागून सुमारे १५ दिवस झाले. भंडारा जिल्ह्यात सध्या पाळीव जनावरांना तोंडखुरी व पायखुरी आजाराने ग्रासले आहे.

तोंडखुरी, पायखुरीने पशुधन संकटात
मोहन भोयर तुमसर
हिवाळ्याची चाहूल लागून सुमारे १५ दिवस झाले. भंडारा जिल्ह्यात सध्या पाळीव जनावरांना तोंडखुरी व पायखुरी आजाराने ग्रासले आहे. यामुळे पशुपालकांना कमालीची चिंता भेडसावत आहे. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत लसीकरण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुध-दुभते जनावरे आहेत. बैलांसह इतर पाळीव जनावरांची संख्या मोठी आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून या जनावरांना तोंडखुरी व पायखुरीची लागण झाली आहे. यामुळे जनावरांना चारा चघळता येत नाही तथा पायखुरीमुळे चालता येत नाही. जनावरांच्या तोंडातून केवळ लाळ टपकत आहे. तोंड लालसर झाले असून तोंडात व्रण पडले आहे. जनावरे चारा खात नसल्याने अशक्त झाले आहेत. पायखुरीमुळे त्यांना चालायला त्रास होत आहे.
शेतकऱ्यांचे पशुधन या आजारामुळे संकटात सापडले आहे. जनावरांच्या औषधोपचाराकरिता शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. पशुवैद्यकीय रुग्णालये जिल्हा परिषद व राज्य शासनामार्फत चालविली जातात. दर १० ते १५ कि़मी. अंतरावर ही पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत.
प्रथम शेतकऱ्यांनी घरगुती तथा गावठी उपचार केला, परंतु तोंडखुरी व पायखुरीचा प्रकोप वाढल्याने त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. जे पशुपालक या रुग्णालयात जनावरांना घेवून आले. लसीकरण करण्यात आले, परंतु आजही शेकडो पशुपालक शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात पशूंना घेवून गेले नाही.
सन २००६ मध्ये या खात्याची पुनर्रचना करण्यात आली होती. तुमसर तालुक्यात राज्य शासनाची एकूण सहा पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. त्यात श्रेणी एक व श्रेणी दोनच्या रुग्णालयांचा समावेश आहे. यात देव्हाडी, मिटेवानी, गोबरवाही, चुल्हाड, हरदोली, खापा (तुमसर) यांचा समावेश आहे. यात खापा व हरदोली ही श्रेणी दोनची रुग्णालये आहेत तर उर्वरित चार दवाखाने श्रेणी एकमध्ये येतात. चुल्हाड येथे पशुवैद्यकीय अधिकऱ्यांचे पद रिक्त आहे. गोबरवाही येथे पर्यवेक्षक नाही. तुमसर शहरात सहायक आयुक्तांचे कार्यालय व पशुवैद्यकीय रुग्णालय आहे.
तुमसर तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. यात सिहोरा, नाकाडोंगरी, लेंडेझरी, बपेरा व डोंगरी बु. चा समावेश आहे. येथे डॉक्टरांची पदे भरली आहे. तुमसर तालुक्यात राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मंजूर पदे १७ आहेत. त्यापैकी केवळ ११ भरले आहेत तर ७ पदे रिक्त आहेत.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
ग्रामीण परिसरात जनावरांचेही बोगस डॉक्टरांनी विळखा घातला आहे. काहींना राज्य शासनाने रितसर परवानगी दिली आहे, परंतु झोला छाप डॉक्टरांमुळे ग्रामीण भागात पशूंचा जीव धोक्यात आला आहे. शासकीय यंत्रणा येथे केवळ मूग गिळून गप्प आहे.
पशुधनांची संख्या
तुमसर तालुक्यात गायी १६,०९०, म्हैस १०,७१८ एकूण २६ हजार ८०८ आहे. शेळ्या १४ हजार ३२७, कोंबड्या १३ हजार ८७९ आहेत.
वेळोवेळी पशुंना लसीकरण नियमितपणे करण्यात येते. तोंडखुरी व पायखुरीचे लसीकरण करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार कामे पार पाडली जातात. पशुधनाकडे दुर्लक्ष करण्यात येत नाही.
-डॉ. मंगेश काळे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, तुमसर.