'ब्लू मॉरमॉन' फुलपाखराला मिळाले उंच भरारीचे बळ ...
By Admin | Updated: August 10, 2015 00:18 IST2015-08-10T00:18:34+5:302015-08-10T00:18:34+5:30
खरंच फुलपाखरांशी मैत्री करणे ही संकल्पनाच किती सुंदर, मनाला मोहून टाकणारी आहे नाही?

'ब्लू मॉरमॉन' फुलपाखराला मिळाले उंच भरारीचे बळ ...
प्रशांत देसाई भंडारा
‘‘फुलपाखरू छान किती दिसते!
मी धरू जाता उडू पाहते!!
फुलपाखरू छान किती दिसते!!!’’
खरंच फुलपाखरांशी मैत्री करणे ही संकल्पनाच किती सुंदर, मनाला मोहून टाकणारी आहे नाही? फुलपाखरांशी मैत्री करणे किंवा त्यांचा अभ्यास करणे, त्यांचे छायाचित्रण करणे किंवा त्यांच्यासाठी खास प्रकारचे उद्यान तयार करून त्यांचा, त्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास करणे ही संकल्पना इंग्रज संशोधकाने भारतात रूजवली. त्याने चक्क भारतातल्या १२०० फुलपाखरांच्या जातींवर संशोधन करून एक पुस्तकही लिहिले व येथे आढणाऱ्या फुलपाखरांना पदव्यांप्रमाणे नावेही दिलीत. त्याचपैकी एक फुलपाखरू म्हणजे सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ठरलेले आहे. ते म्हणजे 'ब्लू मॉरमॉन' हे फुलपाखरू.
महाराष्ट्रात शेकरू हा राज्य प्राणी, हरियाल हा राज्य पक्षी, आंबा हा राज्य वृक्ष आणि जारूल हे राज्य फूल अशी राज्य मानचिन्हे आहेत. फुलपाखरे ही सुदृढ पर्यावरण व सुदृढ परिस्थितीचे सूचक आहेत. राज्यात फुलपाखरांच्या परिस्थितीकीय समतोल सांभाळण्याच्या कार्याबद्दल जनसामान्यात जागृती निर्माण करणे व फुलपाखराच्या जैव विविधतेच्या संवर्धनासाठी प्रभावी प्रयत्न करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. ब्लू मॉरमॉन हे राज्यातील सर्वात मोठे फुलपाखरू आहे. राज्यातील बहुतेक वनांच्या प्रकारांचे ते प्रतिनिधीत्व करते. ते पश्चिम घाटापासून विदर्भापर्यंत सर्वत्र आढळते. राज्य जैव विविधता मंडळ तसेच मुख्य वन्यजीव रक्षक यांनी ब्लू मॉरमॉन ला राज्य फुलपाखरू म्हणून घोषीत करण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार राज्य वन्यजीव मंडळाने सदर प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
भारतात १,५०३ फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. अरूणाचल प्रदेशातील जयरामपूर येथे जगातील सर्वात जास्त म्हणजे ९६७ जाती दिसतात, तर सिक्कीममध्ये ७०० फुलपाखरे आढळतात. ३०० प्रजाती या दख्खन घाटात एकवटल्या आहेत. तर महाराष्ट्रात साधारणपणे ३०० प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात 'सदर्न बर्ड विंग' हे जगातले आकाराने सर्वात मोठे फुलपाखरू व 'ग्रास ज्वेल' हे सर्वात छोटे फुलपाखरू आढळते. 'सदर्न बर्ड विंग' नंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे फुलपाखरू म्हणून ब्लू मॉरमॉनची ओळख आहे.
ही ब्लू मॉरमॉन फुलपाखरू साधारण ९० मिमी ते १२० मिती एवढ्या आकाराची असतात. त्यांचा रंग साधारण नेव्ही ब्लू रंगासारखा जर्द मखमली असतो व त्यावर पांढऱ्या व लाल रंगाच्या ठिपक्यांची सुंदर मनमोहून घेणारी नक्षी असते. बरेचदा पावसाळ्यात ही फुलपाखरे बागांमध्ये, माळरानांवर रूंजी घालताना दिसून येतात. फुलपाखरांचे कोशातून बाहेर येणे हा कसोटीचा क्षण असतो. कारण ती भल्या पहाटे काशातून बाहेर येताना त्यांचे पंख ओलावलेले असतात. त्यांना भक्षकांनी गाठू नये म्हणूनच ही निसर्गाने योजना केली असावी. जगभरात १८,००० प्रजाती आढळतात आणि भारतात १,५०३ प्रजाती आढळतात. (शहर प्रतिनिधी)
सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन
फुलपाखरे ही समृध्द जैवविविधतेचे प्रतीक मानली जातात. तसेच फुलपाखरे ही तापमानवाढीच्या बदलाचेही निदर्शक मानली जातात. या सर्व गोष्टींमुळे फुलपाखरांचे निसर्गाच्या साखळीतील स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींमुळेच राज्य सरकारने ब्लू मॉरमॉन फुलपाखरांना राज्य फुलपाखराचा दर्जा देऊन सरकार निसर्ग संरक्षणाकडे किती सकारात्मकदृष्ट्या पाहत आहे हे दाखवून दिले आहे. निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमींसाठी ही आनंदाची बाब ठरावी.
फुलपाखरूचा मनमोहकपणा
फुलपाखरांच्या पंखांवर एक प्रकारची रंगांची पावडर भुरभुरलेली असते. जेव्हा आपण त्यांना स्पर्श करतो तेव्हा तो रंग आपल्या हाताला लागतो. रंग हे त्यांचे सौंदर्य आणि सर्वस्व असते आणि त्या रंगांच्या माध्यमातून ते आपल्याला त्यांचे सर्वस्व देत असतात. आपल्याला जणे काही हाच संदेश देत असतात की तुम्ही जे निसर्गाकडून शिकता, मिळवता, पाहता ते ज्ञान तरल वृत्तीने, उदारपणे दुसऱ्यालाही देत जा, त्याने हे जग समृ्ध्द होईल. जणू काही फुलपाखरे सांगतात, 'गिव्ह युवर कलर्स टू अदर्स'...