भंडाऱ्यात अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह १६ पासून
By Admin | Updated: December 15, 2015 00:39 IST2015-12-15T00:39:51+5:302015-12-15T00:39:51+5:30
अंधांनी अंधांकडून अंधांकरीता काम करण्याचे काम राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्यावतीने मागील २७ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे.

भंडाऱ्यात अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह १६ पासून
गुरव यांची माहिती : २८ वर्षांपासून अंधांसाठी अव्याहत काम
भंडारा : अंधांनी अंधांकडून अंधांकरीता काम करण्याचे काम राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्यावतीने मागील २७ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. यावर्षी भंडारा येथे २८ वा अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह ‘सामर्थ्य २०१५’ चे राज्यस्तरीय आयोजन दि.१६ ते २० या कालावधीत जलाराम मंगल कार्यालयात करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष महादेव गुरव, उपाध्यक्ष रघुनाथ बारड यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
माहिती देताना बारड म्हणाले, यापूर्वी २७ जिल्ह्यात अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात आला. या राज्यस्तरीय अंध कल्याण सप्ताहात राज्यातील ३० अंध शाळा तसेच सर्व शिक्षण अभियान व अपंग एकात्म शिक्षण योजनेतून ५५० विद्यार्थी आपला सहभाग नोंदविणार आहे. यासाठी ब्रेल लिपीतून मराठी, हिंदी व इंग्रजी वाचन, निबंध लेखन, वक्तृत्व, गायन, वादन, काव्यवाचन, कथाकथन, प्रश्नमंजुषा, बुद्धीबळ क्रिकेट व सामूहिक नृत्य व समूह गाण आदी स्पर्धा होणार आहेत.
याशिवाय बुधवारला सकाळी शहरातून जनजागृती मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत ब्रेल वाचन, लेखन, संभाषण, संगणकावर काम करणे, सुईमध्ये दोरा ओवणे, विणकाम, गायन, वादन, टेलिफोन डायलिंग, नोटा ओळखणे आदी कौशल्याचे प्रात्याक्षिक राहणार आहेत.
अध्यक्ष गुरव म्हणाले, या सामर्थ्य २०१५ च्या माध्यमातून सर्व निवासी अंध शाळा, एकात्म शाळा व सर्व शिक्षा अभियानाअंग्तर्गत अंधांना शिक्षण देणाऱ्या शाळातून गुणात्मक शिक्षण दिले जावे. अंधांना विद्या शाखांमध्ये विनासायास प्रवेश मिळेल असे धोरण तयार व्हावे, अंधांना नोकरी ताना अनुभवाची अट शिथिल असावी, नैसर्गिक अंध तसेच पुर्णत: अंध व्यक्तींना संधी देऊन एक टक्का अंधांचा अनुशेष विना विलंब भरून काढावा, खाजगी क्षेत्रातही अंधांसाठी आरक्षण असावे, शैक्षणिक अहर्तेप्रमाणे अंध व्यक्तींना अनुकंपा धोरणानुसार नोकरीत सामावून घ्यावे, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या अंधांना दोनशे वर्गफूट जागा द्यावी, अंध फेरीवाले व्यक्तीसाठी बस स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या असल्याचे सांगितले.
पत्रपरिषदेला उपाध्यक्ष राजू भगत, महासचिव वसंत हेगडे, कोषाध्यक्ष हरी भालेराव, सचिव प्रकाश पंडागळे, सचिव पांडूरंग ठाकरे, महासचिवर रेवाराम टेंभुर्णेकर उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)