भुरेजंगी प्रकल्प बेपत्ता

By Admin | Updated: August 26, 2014 23:07 IST2014-08-26T23:07:56+5:302014-08-26T23:07:56+5:30

सााकोली तालुक्यात तीन सिंचन प्रकल्पाची जागा निश्चित करण्यात आली होती. निम्न चुलबंद प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. भिमलकसा प्रकल्प अंतिम मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. मात्र घानोड

Bleeding project missing | भुरेजंगी प्रकल्प बेपत्ता

भुरेजंगी प्रकल्प बेपत्ता

प्रकल्पाचा विसर : व्याघ्र प्रकल्पामुळे प्रकल्प वन विभागाच्या ताब्यात
संजय साठवणे - साकोली
सााकोली तालुक्यात तीन सिंचन प्रकल्पाची जागा निश्चित करण्यात आली होती. निम्न चुलबंद प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. भिमलकसा प्रकल्प अंतिम मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. मात्र घानोड येथील भुरेजंगी प्रकल्प बेपत्ता झाल्यागत आहे.
साकोली तालुक्यात सिंचनाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे येथील शेतकरी पुर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. साकोली तालुक्यात भातपिकाखाली १९,७३७ हेक्टर तर अन्य पिकासाठी १,८०३ हेक्टर अशी जमीन लागवडीखाली आहे. मात्र अपुऱ्या सिंचन सुविधेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शासनाने साकोली तालुक्यातील कुंभली येथील चलुबंध नदीवर निम्नचुलबंध प्रकल्प तयार करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाचे काम मागील १५ वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी अजुनपर्यंत या प्रकल्पाअंतर्गत बुडीत शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही या प्रकल्पापासून ८,८७६ हेक्टर शेतजमीनला सिंचनाची सोय होणार आहे. मात्र या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. यावर्षी प्रकल्पाचे पाणी अडविण्यात आले असले तरी या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होणार नाही.
दुसरा सिंचन प्रकल्प हा वडेगाव येथे असून भिमलकसा या नावाने ओळखला जातो. या प्रकल्पाच्या चारही बाजुला टेकड्या आहेत. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पुर्ण झाले आहे. १० टक्के काम वनकायद्यात अडकले होते.
आता या वनकायद्यातून या प्रकल्पाची सुटका झाली असून या प्रकल्पाच्या कामाला गती येणार आहे. शासनाने या प्रकल्पासाठी वनजमिनीचे १५ कोटी रुपये जमा केले आहे. या प्रकल्पाला अंतिम मान्यतेची प्रतिक्षा आहे. त्यामुळे हाही प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे.
साकोली तालुक्यातील तिसरा आणि महत्वाचा घानोड येथील भुरेजंगी प्रकल्प होय. मागील ३० वर्षापासून वनकायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या या प्रकल्पाची अजुनही वनकायद्यातून सुटका झालेली नाही. सन १९८२ मध्ळे घानोड येथील भुरेजंगी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली.
या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १ कोटी १६ लाख २३ हजार रूपये अंदाजपत्रकानुसार मंजूर करण्यात आली होती. या प्रकल्पाचे काही प्रमाणात काम केल्यानंतर हा प्रकल्पही वनकायद्यात अडकला. तेव्हापासून या प्रकल्पाकडे कुणीही ढुंकूनही पाहिले नाही.
या प्रकल्पापासून १,३३७ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ होणार होता. यात परिसरातील घानोड, आमगाव, बोरगाव, परसटोला, सोनपुरी, बोदरा, एकोडी, किन्ही, पळसपाणी, बाम्पेवाडा, उमरझरी, शिवणटोला, आतेगाव या गावातील शेतीला सिंचनाचा फायदा होणार होता. परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी अनेकदा निवेदन दिले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. या ३० वर्षाच्या काळात कोणत्याही लोकप्रतिनिधींनी साधी चौकशी केली नाही.
मागील दोन वर्षापासून नागझिरा अभयारण्य हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाले. त्यामुळे या प्रकल्पाच्या क्षेत्रफळात वाढ करण्यात आली. या या वाढीव क्षेत्रात भुरेजंगी प्रकल्पाचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला मान्यता मिळणार की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हा प्रकल्प बेपत्ता झाल्यासारखा आहे. साकोली तालुक्यातील हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाले तर हरितक्रांती नक्कीच घडून येईल, यात शंका नाही.

Web Title: Bleeding project missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.