लोहार, गारुडी समाज विकासापासून दूर

By Admin | Updated: October 4, 2015 01:24 IST2015-10-04T01:24:24+5:302015-10-04T01:24:24+5:30

स्वातंत्र्याच्या साठीनंतरही लोहार, पारधी, बेलदार, गारूडी समाजाच्या नशिबी भटकंतीच आली आहे.

Blacksmith, Garudi society is far from the development | लोहार, गारुडी समाज विकासापासून दूर

लोहार, गारुडी समाज विकासापासून दूर

शासनाची उदासीनता : संसार डोक्यावर घेऊन या गावातून त्या गावात भटकंती
लाखांदूर : स्वातंत्र्याच्या साठीनंतरही लोहार, पारधी, बेलदार, गारूडी समाजाच्या नशिबी भटकंतीच आली आहे. हा समाज विकासापासून कोसो दूर आहे. भटके जीवन त्यांच्या वाट्याला आले असून त्यांच्या विकासासाठी शासनाचे धोरणच उदासीन आहे.
भटके जीवन जगणारा समाज घरादाराविना आपला संसार डोक्यावर घेऊन या गावातून त्या गावात भटकंती करीत आयुष्याचे ओझे वाहत आहे. शासन, प्रशासनाच्या नजरेतही चोर, अपराधी अशीच त्यांची ओळख आहे.
जनगणनेमध्ये या समाजातील नागरिकांचा समावेश आहे किंवा नाही हे सुद्धा माहिती नाही. लोहार, पारधी, गारूडी, बेलदार या भटके जीवन जगणाऱ्या समाजाला अजूनही अन्य लोकांसारखे सुखी आयुष्य जगता आले नाही. त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्येही अभाव आढळून येत आहे. सर्वस्व गमावलेल्या या समाजाला कोणताच सन्मान नाही. असे असतानाही शासनाकडून या समाजाच्या विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. या समाजातील नागरिक मोठ्या गावात किंवा शहरात गेल्यास सर्वप्रथम या समाजातील कुटुंबप्रमुखांना पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावावी लागते. त्यांच्या राहत्या वेळात कोणतीही घटना घडल्यास सर्वप्रथम त्यांना पोलिस ठाण्यात बोलाविले जाते. विशेष म्हणजे या भटकंती करणाऱ्या समाजाचे नाव शासकीय कार्यालयात नाही. एखाद्या सरकारी कामासाठी अत्यंत आवश्यकतेचे कागदपत्र त्यांना लागत असल्यास त्यांना कुठेच मिळत नाही. जीवाचे रान करीत खाण्यापुरते पैसे जमा करणारा हा समाज स्वातंत्र्याच्या साठीनंतरही अगतिकतेचे जिणे जगत आहे. शासनाने या संदर्भात ठोस पाऊल उचलून या समाजाचा विकास घडवून आणावा असेच आता बोलले जात आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Blacksmith, Garudi society is far from the development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.