भाजपचा दणदणीत विजय
By Admin | Updated: October 19, 2014 23:15 IST2014-10-19T23:15:39+5:302014-10-19T23:15:39+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही क्षेत्रात भाजपने दणदणीत विजय मिळवून एकहाती विजय संपादन केला आहे. यावेळी काँग्रेस,

भाजपचा दणदणीत विजय
भंडारा : लोकसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही क्षेत्रात भाजपने दणदणीत विजय मिळवून एकहाती विजय संपादन केला आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बसपा, मनसे या पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढूनही भाजपने तिन्ही जागांवर आपले प्रभुत्व सिद्ध केले.
सन २००९ च्या निवडणुकीत आघाडी आणि युती अशी थेट निवडणूक झाली असताना युतीकडे दोन तर आघाडीने एका जागेवर विजय मिळविला होता. यावेळी भाजपने तिन्ही जागा जिंकल्या आहेत. तुमसरात चरण वाघमारे, भंडाऱ्यात रामचंद्र अवसरे तर साकोलीत राजेश काशीवार या सर्वांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय नोंदविला. वाघमारे आणि काशीवार यांच्या विजयाचा प्रवास आता ‘मिनी मंत्रालय ते बिग मंत्रालय’ पर्यंत पोहोचला आहे.
तुमसर क्षेत्रात भाजपचे चरण वाघमारे हे २८,६७९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ७३,९५२ मते मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांना ४५,२७३ मते मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे राजेंद्र पटले यांना ३६,००५ तर काँग्रेसचे प्रमोद तितीरमारे यांना १७,५७९ मतांवर समाधान मानावे लागले.
भंडारा क्षेत्रात भाजपचे अॅड. रामचंद्र अवसरे हे ३६,८३२ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ८३,४०८ मते मिळाली असून बसपाच्या देवांगना गाढवे यांना ४६,५७६ मते मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांना ४२,७६६ तर काँग्रेसचे युवराज वासनिक यांना ३०,६५५ मतांवर समाधान मानावे लागले. भंडाऱ्यात सन २००९ मध्ये युतीच्या बळावर शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर ५५ हजारांहून अधिक मताधिक्यानी विजयी झाले होते. यावेळी त्यांना मताधिक्याएवढीही मते मिळाली नाहीत, हे विशेष.
साकोली क्षेत्रात भाजपचे राजेश काशीवार हे २५,४८९ मतांनी विजयी झाले. त्यांना ८०,९०२ मते मिळाली असून काँग्रेसचे सेवक वाघाये यांना ५५,४१३ मते मिळाली. त्यानंतर बसपाचे महेंद्र गणवीर यांना ३१,६४९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल फुंडे यांना १९,८८८ मतांवर समाधान मानावे लागले.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली होती. त्यानंतर ही लिड मागे पडली नाही. दुपारी २ वाजतानंतर कौल स्पष्ट होऊ लागल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला होता. (जिल्हा प्रतिनिधी)