काँग्रेसच्या गडात भाजपाचा शिरकाव
By Admin | Updated: June 19, 2015 01:01 IST2015-06-19T01:01:24+5:302015-06-19T01:01:24+5:30
येथील पंचायत समितीच्या राजकारणात काँग्रेसचाच बोलबाला होता. तथापि भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडला ...

काँग्रेसच्या गडात भाजपाचा शिरकाव
मागोवा मोहाडी पंचायत समितीचा : काँग्रेसची ४५ वर्षे होती सत्ता
मोहाडी : येथील पंचायत समितीच्या राजकारणात काँग्रेसचाच बोलबाला होता. तथापि भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडला अन् तब्बल ३५ वर्ष अभेद्य असणाऱ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाने शिरकाव केला.
पंचायत समितीची स्थापना झाली तेव्हा काँग्रेसने पंचायत समितीवर झेंडा फडकाविला होता. १९६२ ते १९९७ अशी ३५ वर्ष काँग्रेस प्रणित पक्षाचे पंचायत समितीवर राज्य होते. काँग्रेसच्या गडाला पहिली खिंडार १९९७ च्या निवडणुकीत पडली. भाजपा-सेना व अपक्षाच्या बळावर शिवसेनेने पहिला सभापती बनविला. त्यानंतर भाजपा व सेनेचा सभापती पंचायत समितीच्या सत्तेवर विराजमान झाला. त्यानंतर पुन्हा २००० च्या निवडणुकीत काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावून भाजपा सेनेच्या भगव्याला खाली खेचले. त्यानंतर काँग्रेसचे १० वर्षे राज्य होते. परंतु, २०१० च्या निवडणुकीत परिवर्तन झाले. भाजपाने पंचायत समितीचे १० सदस्य निवडून आणले आणि जिल्हा परिषदेत चार सदस्य पाठवून जिल्ह्याच्या राजकारणात आपला ठसा उमटविला. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस पाच सदस्यावर थांबली. २०१० च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा एक व राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य निवडून गेले होते. २०१० ला मोहाडी पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा रोवला गेला. पंचायत समितीच्या प्रांरभीच्या राजकारणात प्रितलाल सव्वालाखे, गोविंद शेंडे, दामोधर पात्रे, रामाजी गायधने यांनी तालुका व जिल्ह्याच्या राजकारणात छाप पाडली होती.
मागील ५२ वर्षाच्या पंचायत समितीच्या राजकारणात भाजपा-शिवसेना सात वर्षे सत्तेवर राहिले तर काँग्रेस समर्थित पक्षाने तब्बल ४५ वर्ष पंचायत समितीच्या राजकारणात सत्तेवर राहिले. आतापर्यंत मोहाडी पंचायत समितीने प्रितलाल सव्वालाखे, दादा शेंडे, दामोधर पात्रे, रामाजी गायधने, मनोहर गायधने, चरण वाघमारे, झगडू बूधे, शिला झंझाड, भाऊराव तुमसरे, देवराव निखारे, प्रमिला साकुरे, भोजराम पारधी व विना झंझाड असे १३ सभापती बघितले आहेत.
आजघडीला मोहाडी पंचायत समितीच्या राजकारणाची दिशा वेगाने बदलली आहे. आता कोणत्याही पक्षाला सत्तेत येण्यासाठी सुलभता उरलेली नाही. कधी एकेकाळी काम्युनिष्ठ पक्षाचा जोर दिसत होता. आतापर्यंत काम्युनिष्ठ पक्षाने पंचायत समितीला तीन सदस्य दिले आहेत. काँग्रेसची मुळे गावागावात रुजली गेली खरी परंतु काँग्रेसमध्ये कार्यकर्ते तयार झाले नाही. मोहाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढविण्यासाठी भर दिला नाही. मोहाडी तालुक्यात भाजपाची बीजे पेरण्याचे खरे काम माजी आमदार रामभाऊ आस्वले यांनी केले. गावागावात निष्ठावान कार्यकर्ता तयार केला. त्याच कार्यकर्त्यांच्या बळावर आज भाजपाला इथपर्यंत पोहोचता आले, हे नाकारता येणार नाही. आजघडीला भाजपा एक संघ राहिलेला नाही. हा पक्ष गटागटात विखुरली गेला आहे. त्याचा प्रत्यय येत असल्याची भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. आजघडीला तालुक्यासह जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढलेली आहे. त्या बळावर निवडणुका लढविल्या जात आहेत. परंतु, भाजपाच्या संभावित उमदेवारांना बंडखोरांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. आजघडीला मोहाडी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी पक्षाच्या मागे आहे. ४ जुलैला होणाऱ्या निवडणुका चुरशीच्या होणार असून त्यापूर्वी उमेदवारी मिळण्यासाठी सर्वच पक्षात रस्सीखेच सुरू आहे. आता पक्षश्रेष्ठी कुणाला शांत करते आणि कुणाला समोर करते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)