भाजपच स्वतंत्र विदर्भ करणार
By Admin | Updated: February 6, 2016 00:33 IST2016-02-06T00:33:48+5:302016-02-06T00:33:48+5:30
मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची दखल न घेणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भावर सातत्याने अन्याय केला.

भाजपच स्वतंत्र विदर्भ करणार
दत्ता मेघे यांचा विश्वास : विदर्भ विकास परिषदेची बैठक
भंडारा : मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची दखल न घेणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भावर सातत्याने अन्याय केला. परंतु, स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत केंद्र व राज्य सरकारचे धोरण स्पष्ट असून स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा भाजप सरकारच्याच कार्यकाळात होईल, असा विश्वास विदर्भ विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार दत्ता मेघे यांनी व्यक्त केला.
विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या भंडारा जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी विदर्भ विकास परिषदेच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर विश्रामभवनात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
यावेळी मेघे म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात सामाजिक कार्य सुरू आहे. आरोग्य सुविधा व कुपोषण निमूर्लन, बालमजुरी व बाल गुन्हेगारी रोखणे, ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळवून देणे, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, तरूणांना रोजगार मिळवून देणे, गरजुंना मदत करण्यासाठी परिषदेचे काम सुरू आहे.
काँग्रेसचा खासदार असताना आपले सामाजिक कार्य पक्षाला रूजले नाही, त्यामुळे आपणास हे काम बंद करण्यासाठी बजावण्यात आले होते. त्यानंतर नाईलाजास्तव परिषदेचे काम बंद करावे लागले. भाजपमध्ये प्रवेश केल्याल्यानंतर पुन्हा विदर्भ विकास परिषदेच्या माध्यमातून काम करीत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे काम विदर्भात पोहोचविण्यासाठी विदर्भाचा दौरा सुरू केला आहे. स्वतंत्र विदर्भ ही आधीपासूनची मागणी असली तरी काँग्रेसचा याला विरोध आहे. आता केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे.
लहान राज्य निर्मितीचे भाजपचे धोरण असल्याने विदर्भ राज्य होणे आता अवघड राहीले नाही. सन २०१९ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीख कुरैशी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)