बाजार समितीवर भाजपा राष्ट्रवादीचा कब्जा
By Admin | Updated: September 9, 2015 00:27 IST2015-09-09T00:27:21+5:302015-09-09T00:27:21+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवून बहुमत सिद्ध केले.

बाजार समितीवर भाजपा राष्ट्रवादीचा कब्जा
काँग्रेसची पिछेहाट : निवडणूक लाखनी-साकोली कृषी उत्पन्न बाजार समितीची
लाखनी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवून बहुमत सिद्ध केले. काँग्रेस समर्थित माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नेतृत्वातील शेतकरी परिवर्तन पॅनेलला ६ जागांवर समाधान मानावे लागले तर अपक्ष पॅनेलला खातेही उघडता आलेले नाही.
शेतकरी विकास पॅनेलने सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटातून शिवराम गिऱ्हेपुंजे, सुरेश कापगते, महेश पटले, केशव मांडवटकर, वसंता शेळके, अशोक चोले, महिला गटातून पुष्पा गिऱ्हेपुंजे, वनिता तरोणे, भटक्या जमाती गटातून सोमा मांढरे, ग्रामपंचायत गटातून श्याम शिवणकर, व्यापारी गटातून घनश्याम खेडीकर, पणन प्रक्रिया गटातून मनिष कापगते, हमाल गटातून मनोहर जांभुळकर यांनी विजय प्राप्त केला. शेतकरी परिवर्तन पॅनेलने सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण गटातून उमराव आठोडे, ओबीसी गटातून रामकृष्ण वाढई, ग्रामपंचायत गटातून सर्वसाधारण गटातून चुन्नीलाल बोरकर, अनुसूचित जाती नाजुकराम भैसारे, दुर्बल गटातून अनमोल काळे, व्यापारी गटातून खिरोज गायधनी यांनी विजय प्राप्त केला आहे. सेवा सोसायटी गटातून महेश पटले व ब्रिजलाल समरीत यांना ४०५ मते मिळाली होती. ईश्वरचिठ्ठीने महेश पटले यांचा विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रल्हाद हुमणे व प्रदीप मेश्राम, उमेश गुरव यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)