माेहाडी, लाखांदूरमध्ये भाजप, लाखनीत राष्ट्रवादीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 05:00 AM2022-02-18T05:00:00+5:302022-02-18T05:00:12+5:30

भंडारा जिल्ह्यातील माेहाडी, लाखांदूर आणि लाखनी या तीन नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी दाेन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. गुरुवारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. माेहाडी नगरपंचायतीत १७ पैकी ९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले हाेते. मात्र भाजपमध्येच दाेन गट पडल्याने सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे लागले हाेते. मात्र एका गटाने बुधवारी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविराेध झाली.

BJP in Maehadi, Lakhandur, NCP's flag in Lakhani | माेहाडी, लाखांदूरमध्ये भाजप, लाखनीत राष्ट्रवादीचा झेंडा

माेहाडी, लाखांदूरमध्ये भाजप, लाखनीत राष्ट्रवादीचा झेंडा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
माेहाडी/लाखनी/लाखांदूर : नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारत माेहाडी आणि लाखांदूर नगरपंचायतीवर आपला झेंडा राेवला, तर लाखनी नगरपंचायत राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात राखली. भाजप, काॅंग्रेस आणि अपक्षांना उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या माेहाडी नगरपंचायतीत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविराेध निवडल्या गेले. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला.
भंडारा जिल्ह्यातील माेहाडी, लाखांदूर आणि लाखनी या तीन नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी दाेन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. गुरुवारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. माेहाडी नगरपंचायतीत १७ पैकी ९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले हाेते. मात्र भाजपमध्येच दाेन गट पडल्याने सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे लागले हाेते. मात्र एका गटाने बुधवारी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविराेध झाली. नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेखर डेकाटे आणि उपाध्यक्षपदी शैलेश दवडू गभणे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविराेध हाेईल असे कुणालाच वाटत नव्हते. उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करणे व मागे घेण्याचा दिनांक हाेता. उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून शैलेश गभणे, तर राष्ट्रवादीकडून सचिन गायधने यांनी नामांकन दाखल केले. परंतु मुदतीत राष्ट्रवादीचे गभणे यांनी अर्ज मागे घेतल्याने या दाेन्ही पदांची निवडणूक अविराेध पार पडली. सभेला भाजपचे नऊ, तर राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक हजर हाेते. काॅंग्रेसचे दाेन नगरसेवक मात्र अनुपस्थित हाेते.
लाखनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या त्रिवेणी पाेहरकर, तर उपाध्यक्षपदी काॅंग्रेसचे प्रदीप तितीरमारे यांची निवड झाली. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून त्रिवेणी पाेहरकर, तर भाजपकडून सारिका बसेशंकर यांनी अर्ज दाखल केले हाेते. उपाध्यक्षपदासाठी काॅंग्रेसकडून प्रदीप तितीरमारे, तर भाजपकडून महेश आकरे यांनी नामांकन दाखल केले. हात उंचावून झालेल्या निवडणुकीत पाेहरकर यांना दहा, तर बसेशंकर यांना सहा मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही तितीरमारे यांना दहा, तर आकरे यांना सहा मते मिळाली. या निवडणुकीत अपक्ष ज्याेती निखाडे तटस्थ राहिल्या. निवडणुकीच्यावेळी १७ नगरसेवक उपस्थित हाेते. राष्ट्रवादी काॅंग्रेस आठ व काॅंग्रेसचे दाेन अशी आघाडी तयार करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड, मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांनी कामकाज पाहिले. यानंतर ढाेलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

लाखांदूरमध्ये दुसऱ्यांदा भाजपची सत्ता

लाखांदूर : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणूकीत एका अपक्ष नगरसेवकाच्या सहकाऱ्याने सत्ता स्थापित केली. या नगरपंचायतीवर भाजपने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे विनाेद ठाकरे तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद देशमुख यांची निवड करण्यात आली.
१७ पैकी ९ जागा भाजपने जिंकून स्पष्ट बहूमत प्राप्त केले हाेते. काॅंग्रेसला सहा व अपक्षानी दाेन जागा मिळविल्या हाेत्या. नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे विनाेद ठाकरे व काॅंग्रेसचे चुन्नीलाल नागमाेती यांनी नामांकन दाखल केले हाेते. दाेन पैकी एका अपक्षाने समर्थन दिल्याने काॅंग्रेसचे संख्याबळ सात झाले हाेते. तर एका अपक्षाने भाजपला समर्थन दिले. त्यामुळे भाजपचे संख्याबळ दहा झाले. गुरुवारी झालेल्या निवडीत नगराध्यक्षपदासाठी ठाकरे व उपाध्यक्ष पदासाठी देशमुख यांना प्रत्येकी दहा मते मिळाली.

 

Web Title: BJP in Maehadi, Lakhandur, NCP's flag in Lakhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.