भाजप सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

By Admin | Updated: November 29, 2014 00:40 IST2014-11-29T00:40:22+5:302014-11-29T00:40:22+5:30

सहा महिन्यांपूर्वी केंद्रात आणि एक महिन्यापूर्वी राज्यात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही.

BJP government's betrayal of farmers | भाजप सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

भाजप सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

भंडारा : सहा महिन्यांपूर्वी केंद्रात आणि एक महिन्यापूर्वी राज्यात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. तोंडाला पाने पुसणाऱ्या या सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना जागे करण्यासाठी ८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी मोर्चाचे संयोजक तथा माजी मंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जीया पटेल, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे उपस्थित होते. यावेळी आ.वडेट्टीवार आणि नितीन राऊत म्हणाले की, सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती आहे. यात शेतकरी होरपळून निघत आहे. मागील तीन वर्षांपासून ही परिस्थिती आहे. दोन वर्षात आघाडी सरकारने शेतकऱ्यांना १० हजार २०० कोटी रुपयांची मदत दिली. मात्र आताचे केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असतानांही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तोकड्या मदतीची मागणी केंद्राकडे केली आहे. मागीलवर्षी शेतकऱ्यांच्या धानाला आघाडीच्या सरकारने प्रतिक्विंटल १५० रुपये भाववाढ दिली होती. याशिवाय २०० रुपये प्रतिक्विंटल बोनसही दिला होता. मात्र यावेळी भाजप सरकारने बोनस तर दूर, धानाला अवघी ५० रुपये भाववाढ देऊन शेतकऱ्यांबाबत किती संवेदनाशुन्य आहेत याचा परिचय दिला आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. मागीलवर्षी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकारवर तोंडसुख घेणारे भाजपचे मंत्री एकनाथ खडसे आता सरकारमध्ये येताच शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला.
एलबीटी रद्द होऊ शकत नाही
आघाडी सरकारने सुरु केलेल्या एलबीटीला ‘लुटो-बाटो’ म्हणणारे आता सत्तेत आले आहेत, त्यांनी हा कर रद्द करण्याची गरज आहे. परंतु या मुद्यावर रान पेटवून आणि व्यापाऱ्यांची सहानुभूती मिळवून निवडून येताच ते व्यापाऱ्यांची फसवणूक करु लागले आहेत. एलबीटीला पर्याय जीएसटी सुरु करायचा असला तरी २०१६ पर्यंत हा एलबीटी रद्दच होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. बहुमतात नसलेल्या या सरकारविरुद्ध पहिल्याच दिवशी जाब विचारणार आहोत.
१ डिसेंबरपासून सुरु होणार
निदर्शने, रास्ता रोको
८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर निघणाऱ्या मोर्चाच्या आधी १ डिसेंबरला सर्व तालुकास्थळी सरकारच्या उदासीनविरूद्ध निदर्शने करून तहसीलदारांना निवेदने दिली जातील. त्यानंतर ४ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. नागपूरच्या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी काँग्रेस नेत्यांनी केले.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: BJP government's betrayal of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.