कटकवार विद्यालयात पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिर
By Admin | Updated: May 15, 2016 00:22 IST2016-05-15T00:22:35+5:302016-05-15T00:22:35+5:30
येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय हरित सेनेतंर्गत असलेल्या ...

कटकवार विद्यालयात पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिर
उपक्रम शाळेचा : १६ वर्षांपासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील एकमेव निसर्ग शिबिर
साकोली : येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय हरित सेनेतंर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचे लागोपाठ १६ व्या वर्षी १० दिवसीय पक्षी निरीक्षण व निसर्ग अभ्यास शिबिराचे आयोजन ३० एप्रिल ते १० मे या काळात करण्यात आले.
ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी सहभागी शिबिरार्थींना दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी ७ ते ११ या वेळात निसर्गभ्रमंती करवून त्याद्वारे त्यांना वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख, त्यांचे इंग्रजी-मराठी नावे, नर-माती फरक, त्यांचे अधिवास व सवयी याबद्दल माहिती, विविध प्रकारचे फुलपाखरे, किटक, सरपटणारे प्राणी, सापांची ओळख, विषारी, बिनविषारी सर्पसृष्टी, वनस्पती, फुले, बीज संकलन, ग्रह, तारे, नक्षत्र, तारका, आकाशगंगा यांचे ओळख तसेच टाकावू वस्तुपासून घरटे, पाणपोई व फिडर बॉटल पक्ष्यांसाठी कसे तयार करावे याचे मार्गदर्शन या शिबिरात देण्यात आले. तसेच दुर्बिन व पुस्तकाद्वारे पक्ष्यांची ओळख करण्यात आली.
प्रथम दिवशी शिबिरार्थींना शालेय परिसर व तलाव परिसरात निसर्ग भ्रमंती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी नर्सरी पहाडीवर ट्रेफिंग करून शिबिरार्थीनी अॅडव्हेन्चरचा अनुभव घेतला. चौथ्या दिवशी गडकुंभली पहाडी व तलाव या ठिकाणी निसर्गनिरीक्षणाचा आनंद घेतला. पाचव्या दिवशी शिवनीबांध तलाव, मस्त्यकेंद्र, सामाजिक वनीकरण रोपवाटीकेला भेट देण्यात येवून विविध उपक्रमाची माहिती घेण्यात आली. सहाव्या दिवशी कृषी विज्ञान केंद्र व कृषी चिकित्सालय या ठिकाणी भेट देऊन विविध कृषीविषयक उपक्रम, साहित्य व अवजारे त्याचबरोबर मधमाशीपालन पेट्या व त्यांचे तंत्र निसर्ग अभ्यासासोबत समजावून घेण्यात आले. सातव्या दिवशी आलेबेदर जमनापूर परिसरात ट्रेकिंग करून भिक्कुकुटीला भेट देण्यात आली. आठव्या दिवशी गिरोला देवस्थान, कायनाईट खाण व जंगल परिसरात निसर्गभ्रमंती करण्यासोबत मधुकरराव हेडावू यांचे शेतातील आंबराईला भेट व कुंभली येथील दुर्गाबाई डोह परिसराला भेट देण्यात येवून नदीपरिसरात व डोहपरिसरात निसर्ग भ्रमंती करण्यात आली. नवव्या दिवशी रावणवाडी परिसर व देवस्थान परिसरात भ्रमंती करण्यात जैवविविधतेचा अभ्यास करण्यात आला. दहाव्या दिवशी निसर्ग पहाडीवरील विश्रामगृहात समारोप कार्यक्रम घेण्यात आला. आदित्य शहारे, युवराज बोबडे, आचल डोंगरवार, चिराग कनोजे, आदित्य डोंगरवार, कुणाल भैसारे यांना उत्कृष्ट निसर्ग शिबिरार्थी म्हणून गौरविण्यात येवून त्यांना पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
निसर्ग शिबिर सहभागी प्रमाणपत्र लोकेश भजे, दर्शन कोटांगले, रितीक शोरी, हृषीकेश कोचे, आर्यन टेंभुर्णे, हर्षा लंजे, शानिद पठाण, यश भजे व पवन रामटेके, सुमेध बोरकर, आदित्य शहारे, युवराज बोबडे, आचल डोंगरवार, चिराग कनोजे, आदित्य डोंगरवार, कुणाल भैसारे, केतकी रामटेके यांना देण्यात येवून प्रत्येकांना निसर्ग पुस्तिका भेट देण्यात आली. १० दिवसीय शिबिराला यशस्वी करण्याकरिता प्राचार्य प्रकाश मस्के, मनीषा काशिवार, पुष्पा बोरकर, विठ्ठल सुकारे, डी.बी. उईके, बी.एस. लंजे, बी.एन. मांदाडे, सेवक कापगते, अनुराधा रणदिवे, शिक्षिका गेडाम, के.पी. बिसेन, संजय पारधी, जागेश्वर तिडके, विनोद तिडके, शुभम कोल, बाळकृष्ण मेश्राम, मंगेश चांगले यांनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)