‘बिपत दास’चा परतीचा प्रवास सुरू

By Admin | Updated: January 15, 2016 01:17 IST2016-01-15T01:17:09+5:302016-01-15T01:17:09+5:30

श्री साईनाथांच्या अपार श्रद्धेपोटी ‘ओडिसा ते शिर्डी’ असा डोक्यावर सार्इंची पालखी घेऊन अनवानी पायाने प्रवास करणाऱ्या बिपत दास या भक्ताने द्वारकामाईची ...

'Bipat Das' return journey | ‘बिपत दास’चा परतीचा प्रवास सुरू

‘बिपत दास’चा परतीचा प्रवास सुरू

१५ फेब्रुवारीला पोहोचणार बोलोनी या स्वगावी
भंडारा : श्री साईनाथांच्या अपार श्रद्धेपोटी ‘ओडिसा ते शिर्डी’ असा डोक्यावर सार्इंची पालखी घेऊन अनवानी पायाने प्रवास करणाऱ्या बिपत दास या भक्ताने द्वारकामाईची तेवत असणारी ज्योत घेऊन परतीचा प्रवास सुरू केला आहे. या प्रवासादरम्यान, तो सोमवारी भंडाऱ्यात दाखल झाला. तीन दिवसांच्या मुक्कामानंतर गुरूवारी ओडिसाकडे परतीच्या प्रवासाला निघाला आहे. बिपत तारण दास (२६) रा. बोलानी जि.केवझर, ओडिसा असे या भक्ताचे नाव आहे.
‘तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन! या साईगीताच्या प्रचितीनुसार बोलानी येथून सुमारे दोन हजार किमी लांब असलेल्या शिर्डीला जाण्यासाठी बिपत दास हा अनवानी पायाने १६ आॅगस्ट २०१५ रोजी निघाला होता. या प्रवासादरम्यान तो ९ सप्टेंबर रोजी भंडाऱ्यात आला होता. भंडाऱ्यातील तुकडोजी महाराज पुतळ्याजवळील हनुमान मंदिरात रात्रभर मुक्कामाला होता. तब्बल अडीच महिन्यानंतर दसऱ्याच्या आदल्या दिवशी तो शिर्डी येथे पोहोचला. तो म्हणतो, मला जेव्हा जेव्हा साईबाबांचा साक्षात्कार होतो, तेव्हा तेव्हा मी अनवानी पायाने शिर्डीच्या प्रवासाला निघतो. सधन कुटुंबातील असल्याने त्याच्याकडे वाहतुकीची अनेक साधने आहेत. तरीसुद्धा तो वाहनाचा उपयोग करीत नाही. यापुर्वी तो दोनदा शिर्डीला पायी गेला आहे. ही त्याची तिसरी वेळ आहे. त्याच्या ओडिसा ते शिर्डी या पायी प्रवासाला तब्बल अडीच महिन्याचा कालावधी लागतो. तो दररोज ४० कि.मी. पायी चालल्यानंतर एखाद्या मंदिरात मुक्काम करतो. सकाळी पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतो. मुक्कामी असताना तो कुणाचीही मदत घेत नाही. आपली व्यवस्था तो स्वत:च करीत असतो.
दरम्यान, शिर्डी येथे पोहोचल्यानंतर त्याने श्री सार्इंचे दर्शन घेतले. आता तो परतीच्या प्रवासाला निघाला आहे. सोमवारी भंडाऱ्यात आला. स्थानिक साईभक्तांच्या आग्रहमुळे त्याने हनुमान मंदिरात तीन दिवस मुक्काम केला. साईबाबांची श्रद्धा असल्याने लिखार कुटुंबाने मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. गुरूवारी सकाळी बिपत दास ओडिसाकडे रवाना झाला. १५ फेबु्रवारीला तो स्वगावी बोलानी येथे पोहचेल. (जिल्हा प्रतिनिधी)

 

Web Title: 'Bipat Das' return journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.