एमसीव्हीसी महाविद्यालयांना बायोमेट्रीक मशीन अनिवार्य

By Admin | Updated: February 24, 2017 00:28 IST2017-02-24T00:28:11+5:302017-02-24T00:28:11+5:30

किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक मशीन लावण्याचा आदेश धडकला आहे.

Biometric machine compulsory for MCVC colleges | एमसीव्हीसी महाविद्यालयांना बायोमेट्रीक मशीन अनिवार्य

एमसीव्हीसी महाविद्यालयांना बायोमेट्रीक मशीन अनिवार्य

अन्यथा वेतन बंद : वेतनासोबत प्रमाणपत्र जोडण्याचे निर्देश
तुमसर : किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक मशीन लावण्याचा आदेश धडकला आहे. बायोमेट्रीक मशीन लावण्याचे प्रमाणपत्र वेतनाच्या देयकासोबत न दिल्यास तेथील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन निघणार नाही. त्यामुळे संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक मशीन लावण्याकरिता धडपड सुरु आहे.
किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाच्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांसोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी वेळेवर व पूर्ण वेळ उपस्थित राहावे, याकरिता शासनाने बायोमेट्रीक प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आश्रमशाळा, रूग्णालये तथा इतर शासकीय कार्यालयात बायोमेट्रीक मशीन लावण्यात आले. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, दांडी मारू नये, हा त्या मागचा हेतू आहे. प्रथमच शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयांना संलग्नीत किमान कौशल्यावर आधारित व्यावसायीक अभ्यासक्रमालासुध्दा बायोमेट्रीक मशीन आवश्यक करण्यात आली. चालू महिन्यात हे उपकरण लावण्याचे निर्देश दिले आहेत. वेतन बिलासोबत तसे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांना बायोमेट्रीक मशीन लावणे अनिवार्य आहे. अशी माहिती शिक्षकांनी दिली.
अनेक ठिकाणी बायोमॅट्रीक मशीन पैसा खर्च करुन लावण्यात आल्या. काही महिन्यानंतर त्या बंद पडल्या. त्यामुळे त्याचा मुख्य हेतू सिध्द झाले नाही. केवळ आदेशाची अंमलबजावणी व मशीनची खरेदी करणे एवढाच सोपस्कार पार पडल्याचे दिसून येते. बंद पडलेल्या मशीनची माहिती मात्र शासनाकडून घेतली जात नाही. आजही शासकीय कार्यालयात बायोमेट्रीक मशीन बंद स्थितीत दिसून येत आहेत. हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Biometric machine compulsory for MCVC colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.