विश्वासावर कर्ज वितरण शासनाचे मोठे पाऊल
By Admin | Updated: October 22, 2015 00:32 IST2015-10-22T00:32:51+5:302015-10-22T00:32:51+5:30
ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे.

विश्वासावर कर्ज वितरण शासनाचे मोठे पाऊल
नाना पटोले : भंडारा, तुमसर येथील ६० लोकांना कर्जाचा लाभ
भंडारा : ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेची विशेष मोहीम राबवून भंडारा व तुमसर येथील ६० लोकांना ३० लाख रुपयांचे कर्ज वितरण खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, रिझर्व्ह बॅकेचे राव, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, नाबार्डचे महाव्यवस्थापक अरविंद खापर्डे उपस्थित होते.
यावेळी खा. पटोले म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली पाहिजे. बँकेच्या व्यवहाराशी तळागाळातील माणुस जोडला पाहिजे. पुर्वी सबसिडीच्या योजनांचा लाभ लोकांना झाला नाही, त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ९ ते १० टक्के व्याजदराने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण माणूस उभा राहिला पाहिजे. त्यासाठी कर्जदारांनी सुध्दा काळजी घेऊन कर्ज परतफेड केली पाहिजे. कुठलिही हमी न घेता कर्ज देण्याची व्यवस्था शासनाने उभी केली आहे. केवळ विश्वासावर कर्ज देण्यात येत आहे. हे मोठे पाऊल असून या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी कर्जदारांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांच्या हस्ते अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, विजया बँक, सिंडीकेट बँक, वैनगंगा बँकेच्या ३० कर्जदारांना १५ लाखाचे कर्ज वितरण करण्यात आले. तुमसर येथे सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक आॅफ बडोदाच्या ३० कर्जदारांना १५ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यात १,५६२ कर्जदारांना कर्ज वाटपाच्या उद्दिष्ट देण्यात आले.
प्रास्ताविकात प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी माहिती देताना राव म्हणाले, ही योजना तीन टप्यात असून शिशु, किशोर व तरुणांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. शिशु योजनेत ० ते ५० हजारपर्यंत, किशोर योजनेंतर्गत ५० हजार ते ५ लाखपर्यंत कर्ज देण्यात येते. व्याजाचा दर मार्च २०१६ पर्यंत ७ टक्के व पुढे ७.५ टक्के असा आहे. ही योजना ग्रामपातळीवर पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. लघु उद्योजकांच्या विकासासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे प्रबंधक, कर्जधारक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)