भीम सेना, डोरेमन डिजिटल राख्यांचे आकर्षण
By Admin | Updated: August 29, 2015 00:47 IST2015-08-29T00:47:59+5:302015-08-29T00:47:59+5:30
एका दिवसांवरच येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त शहरातील बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजली असून, राखी खरेदीसाठी महिला व मुलींची चांगलीच गर्दी जमली आहे.

भीम सेना, डोरेमन डिजिटल राख्यांचे आकर्षण
रक्षाबंधन : रंगीबेरंगी राख्यांनी बाजारपेठ सजली
भंडारा : एका दिवसांवरच येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त शहरातील बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजली असून, राखी खरेदीसाठी महिला व मुलींची चांगलीच गर्दी जमली आहे. चिमुकल्यांना छोटा भीम, भीम सेना तसेच डोरेमन आदी कार्टूनच्या डिजीटल राख्या आकर्षित करत आहेत.
रक्षाबंधनाच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या राखीमध्ये काळानुरूप बदल घडत आहेत. रेशमी धाग्यांपासून सुरू झालेल्या राखीचा प्रवास थेट डिजीटल राखीपर्यंत येऊन पोहचला आहे. रक्षाबंधणाचा हा सण एका दिवसांवर येऊन ठेपला असल्याने शहरातील बाजारपेठ सजली आहे. राखी खरेदीसाठी महिला व मुलींची गर्दी वाढली आहे.
रेशीम धाग्यांची राखी तसेच विविध खड्यांनी सजविलेल्या राख्या महिलांना आकर्षित करत आहेत. असे असले तरी, यंदाच्या राखीवर छोटा भीम, भीम सेना तसेच डोरेमन या कार्टून पात्रांची छाप दिसून येत आहे.
कार्टून आणि बच्चे कंपनी यांच्यातील अतूट बंधन आता राखीच्या माध्यमातूनही दिसून येत आहे.
व्यवसाय मंदावला; किमती मात्र स्थिर
यंदा पाऊस नसल्याने इतर व्यवसायांप्रमाणे राखी व्यवसायावरदेखील परिणाम झाला असून, मागील वर्षीच्या तुलनेत विक्री मंदावली आहे. असे असले तरी, राखीच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या असून, यामध्ये कुठल्याही प्रकारे वाढ करण्यात आली नाही. बाजारपेठेत साधी राखी ६ ते ९० रुपये डझन तर, डिजीटल राखी २० ते ८० रुपये प्रती राखी या किमतीमध्ये विक्री होत आहे.
स्पंच व जरी राखीचे आकर्षण कायम
बाजारपेठेत सध्या डिजीटल राख्यांची चर्चा असली, तरी अजूनही स्पंच व जरीच्या राखीचे आकर्षण कायम आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून स्पंचच्या राखीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच मारवाडी समाजात जरीच्या राखीचे आकर्षण कायम आहे. स्पंचच्या राखीची किंमत ६ ते २२ रुपये डझन, जरीच्या राखीची किंमत २२ रुपये ते ५०० रुपये डझन आहे.