भारनियमनाचा फटका धानपिकाला
By Admin | Updated: October 3, 2014 01:09 IST2014-10-03T01:09:52+5:302014-10-03T01:09:52+5:30
भारनियमनामुळे सहा गावातील संपूर्ण धान पीक धोक्यात आले आहे. दोन दिवस धानाला पाणी मिळाले नाही तर पीके नष्ट होतील.

भारनियमनाचा फटका धानपिकाला
तुमसर : भारनियमनामुळे सहा गावातील संपूर्ण धान पीक धोक्यात आले आहे. दोन दिवस धानाला पाणी मिळाले नाही तर पीके नष्ट होतील. याविरोधात शेकडो शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंत्याला तुमसर येथील कार्यालयात घेराव करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. सायंकाळपर्यंत आंदोलनकर्ते कार्यालयात बसून होते.
उमरवाडा, नवरगाव, बोरी, कोष्टी, डोंगरला, बाम्हणी येथे १६ तास भारनियमन सुरु आहे. केवळ आठ तास वीज पुरवठा सुरु राहतो. त्यातही तांत्रिक बिघाड सुरुच आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास उपकार्यकारी अभियंत्यांना शेकडो शेतकऱ्यांनी घेराव केला. निदर्शने व नारेबाजी केली. उपकार्यकारी अभियंता गडपायले यांनी कार्यकारी अभियंता अमीत परांजपे व अधीक्षक अभियंता सतीश मेश्राम यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून घेरावा संदर्भात माहिती दिली. परंतु त्यांनी ठोस आश्वासन दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी शिवाय काहीच करता येत नाही असे उपकार्यकारी अभियंता गडपायले यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू होते. कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली. खासदारांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी काय ते बघतो असे सांगितल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील विद्युत फिडरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्यामुळे याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिक घेत असताना भारनियमन का करण्यात येते याकडे बळीराजा वारंवार प्रश्न विचारत असला तरी लोकप्रतिनिधींसह सामान्य प्रशासनही लक्ष देत नाही. (तालुका प्रतिनिधी)