विदेशी भाजी उत्पादकांना भंडारातील शेतीचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 21:53 IST2019-01-18T21:52:45+5:302019-01-18T21:53:38+5:30

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक पट्ट्यातील विषमुक्त भाजीपाला शेतीची महती आता सातासमुद्रापार गेली असून याच आकर्षणातून कंबोडियाचे एक भाजी उत्पादक जोडपे थेट चुलबंद नदीच्या खोऱ्यात पालांदुरात पोहचले. त्याठिकाणी विविध भाजीपाला पीके पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Bhandara's food attraction to foreign vegetable growers | विदेशी भाजी उत्पादकांना भंडारातील शेतीचे आकर्षण

विदेशी भाजी उत्पादकांना भंडारातील शेतीचे आकर्षण

ठळक मुद्देकंबोडियातील पाहुणे पालांदुरात : धान उत्पादक पट्ट््यातील विषमुक्त भाजीपाला शेतीची पाहणी

मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक पट्ट्यातील विषमुक्त भाजीपाला शेतीची महती आता सातासमुद्रापार गेली असून याच आकर्षणातून कंबोडियाचे एक भाजी उत्पादक जोडपे थेट चुलबंद नदीच्या खोऱ्यात पालांदुरात पोहचले. त्याठिकाणी विविध भाजीपाला पीके पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
चन्ना न्युआॅन व युवा सेम असे या जोडप्याचे नावे आहेत. दोघेही तिसीच्या आसपास आहेत. भाजीपाला विषयी त्यांची जिज्ञासावृत्ती ठक्क करणारी आहे. थेट कंबोडिया देशातील टकाव शहरातून ते भारतात दाखल झाले आणि चुलबंद नदीच्या खोऱ्यातील पालांदूर गावात पोहचले. या ठिकाणी त्यांनी विविध भाजीपाला शेतीला भेट दिली. चवळी, लाल भाजी, ब्रोकली, फुलकोबी ही भाजीपाला पीके कोणतेही किटकनाशक फवारणी न करता घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
यावेळी मोहन लांजेवार, भजन नंदुरकर, धनपाल नंदुरकर, बळीराम बागडे, गोकूळ राऊत आदींच्या मळ्याला त्यांनी भेट दिली. या शेतकरींनी कमी खर्चात लागवडीची पद्धत आणि विक्रीची पद्धत समजावून सांगितली. बी पेरणीपासून ते लागवडीपर्यंतची सर्व पद्धत त्यांनी समजून घेतली. यावेळी या विदेशी पाहुण्यांनी सांगितले व्हियतनाम देशातून कंबोडियात दररोज मॅट्रिक टन भाजीपाला आयात केला जातो. मात्र ताजा नसल्याने त्याची चव नसते. चन्ना निआॅन हा तरूण थायलंड येथे बिजनेस मॅनेजमेंटचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. स्वत:च्या घरी शेती असून धान उत्पादन करीत असल्याचे सांगितले. यावेळी भाषेची अडचण कृषीमित्र सुधीर धकाते यांनी दूर केली. गावकरी आणि या विदेशी पाहुण्यात त्यांनी संवाद साधण्यासाठी मदत केली.
माल विक्रीची पद्धत भावली
शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची बाजारपेठ व योग्य भाव मिळावा याची शाश्वती बीटीबीने जिल्ह्याला दिली आहे. बीटीबीचे बंडू बारापात्रे यांच्या मार्गदर्शनात येथील भाजीपाला सातासमुद्रापार जात आहेत. येथील मालविक्रीची पद्धत कंबोडियातून आलेल्या या दोनही पाहुण्यांना चांगलीच भावली.

Web Title: Bhandara's food attraction to foreign vegetable growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.