भंडारा जिल्हा परिषदेचे ७.३८ कोटींचे अंदाजपत्रक
By Admin | Updated: March 27, 2015 00:22 IST2015-03-27T00:22:28+5:302015-03-27T00:22:28+5:30
जिल्हा परिषदेने ७ कोटी ३८ लाख ९२ हजार ७०० रूपये खर्चाचे आणि ७७ हजार ७०० रूपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

भंडारा जिल्हा परिषदेचे ७.३८ कोटींचे अंदाजपत्रक
भंडारा : जिल्हा परिषदेने ७ कोटी ३८ लाख ९२ हजार ७०० रूपये खर्चाचे आणि ७७ हजार ७०० रूपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पाला मंजूरी प्रदान करण्यात आली. अर्थ व बांधकाम समिती सभापती संजय गाढवे यांनी अंदाजपत्रक सादर केला.
जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्ष वंदना वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. २०१४-१५ चे सुधारित व २०१५-१६ चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाकरिता सुधारित अर्थसंकल्पात ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून शिल्लक निधी बँकेत जमा ठेवल्याने त्यावर ९ कोटी ५३ लाख ७५ हजारांचे व्याज जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. ही मोठी रक्कम जिल्हा परिषदेच्या हातात असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अंदाजपत्रकात कमी तरतूद केली आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित अंदाजपत्रकात प्रामुख्याने मागासवर्गीयांच्या वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजनांवर विशेष भर देण्यात आला आहे.
मागासवर्गीयांसाठी अनुशेषासह भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यात समाज कल्याण विभागासाठी ५५ लाख ६० हजार रूपये, महिला व बालकल्याण विभागासाठी २७ लाख १५ हजार ५०० रूपये तर जलयुक्त शिवार योजनेसाठी ६५ लाखांची तरतुद करण्यात आली असून हा निधी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे वळता करण्यात येणार आहे.
सर्वाधिक तरतुद सामान्य प्रशासन विभागासाठी करण्यात आली आहे. यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी ३४ लाख ६० हजार १०० रूपयाची तरतुद करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांचे मानधन, वाहन दुरूस्ती, इंधन दुरूस्ती सादील खर्च, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी गणवेश, अपंग कर्मचाऱ्यांना साहित्य पुरवणे यावर खर्च करण्यात येईल.
जिल्हा परिषदेला व्यवसाय, व्यापार, कर, जमीन महसूल, मुद्रांक व नोंदणी शुल्क, माल व उतारू कर, विक्रेय वस्तू व सेवा कर, व्याज, सार्वजनिक बांधकाम विभाग, निवृत्ती वेतन, शिक्षण विभाग, बाजार व जत्रा, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, वने, कृषी, पंचायत राज कार्यक्रम, लहान पाटबंधारे व अपारंपारीक उर्जा साधने या विभागांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरून सन २०१५-१६ चा अंदाजपत्रक बनविण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)