भंडारा योगामय

By Admin | Updated: June 22, 2015 00:20 IST2015-06-22T00:20:08+5:302015-06-22T00:20:08+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Bhandara Yogamaya | भंडारा योगामय

भंडारा योगामय

जिल्ह्यात उत्साह : विविध शाळांमध्येही उपक्रम
भंडारा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळ सत्रापासून सुरू झालेल्या योगाभ्यासामुळे जिल्हा योगामय बनल्याचे दृश्य होते. जिल्हा मुख्यालयासह तहसील प्रशासनाने योगदिन कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. जिल्हायातील शासकीय व खाजगी शाळांमध्येही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी हजेरी लावून योग शिकण्याचे तंत्र अवगत केले.
भंडारा येथील येथील पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित कार्यक्रमाला प्रशासनातील विविध विभागासह २५० जणांनी उपस्थिती दर्शविली.
सदर कार्यक्रम आयुष मंत्रालय भारत सरकार, जिल्हा पोलीस प्रशासन, दुर्गा बहुउद्देशिय शिक्षण संस्था (नागपुर) व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मंचावर खासदार नाना पटोले, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रताप धरमशी, प्रशांत गेडाम, डॉ.रत्नाकर बांडेबुचे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, राजेंद्र चिचोंळकर, सुवर्णा मानेकर, नागपुर येथील योगगुरू भारत गुप्ता, प्रा. वामन तुरीले, रामविलास सारडा, शरद साळुंके, रमेश अहिरवार, मुकुंद शेरेकर, डॉ.रमेश खोब्रागडे, राजेंद्र जुवारकर, डॉ.रिता बागडे, छाजुराम शर्मा यांच्यासह पतंजली योग समितीचे सदस्य उपस्थित होते.
खा. नाना पटोले म्हणाले, तरूण आणि कार्यक्षम राहायचे असेल तर मनुष्याने आळसाचा त्याग करून दैनंदिन जीवनात योगाला स्थान दिले पाहिजे. शारीरिक, मानसिकदृष्ट्या प्रतिकार शक्ती व उत्साह संपुष्टात आल्यावर प्रकृती स्वास्थ्य उत्तम, निरोगी ठेवता येण्याच्या हेतूने वेळ, पैसा, श्रम खर्ची पाडून जे सांगेल त्याप्रमाणे उपाय करण्यास प्रवृत्त होतो. जेणेकरून दैनंदिन जीवन सुकरतेने घालविता येईल, असे मौलिक मार्गदर्शन वत्यांनी व्यक्त केले.
यानंतर सामुहिक योगाभ्यास करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुवर्णा मानेकर यांनी तर आभार प्रमोद मालवे यांनी मानले.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जिल्हा सामान्य रूग्णालय, पतंजली योग समितीच्या वतीनेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bhandara Yogamaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.