भंडारा तापला ; पारा ४६ अंशावर
By Admin | Updated: May 19, 2017 00:49 IST2017-05-19T00:49:51+5:302017-05-19T00:49:51+5:30
विदर्भात मागील चार दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांपासून भंडाऱ्याचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले होते.

भंडारा तापला ; पारा ४६ अंशावर
यावर्षीचा उच्चांक : उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भात मागील चार दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांपासून भंडाऱ्याचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले होते. गुरूवारी यात वाढ होऊन पारा ४६ अंशावर पोहचला. परिणामी सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे.
मे हिटचा दणका आबालवृद्धांसह सर्वांनाच जाणवू लागला आहे. सोमवारी हवामान खात्यातर्फे घेण्यात आलेल्या नोंदीत पारा ४४.५ अंश सेल्सीअस इतका होता. मंगळवारपासून यात वाढ होत गेली. शुक्रवारी तापमानाने उच्चांक गाठला. मागीलवर्षी सुद्धा मे महिन्यातच तापमानाने ४६ अंशांचा आकडा पार केला होता. उष्ण लहरीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी दुपारच्या सुमारास बाहेर निघने टाळत आहेत. थंड पेयांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढत असून सायंकाळी ६ वाजतानंतरच बाजारात गर्दी दिसून येत आहे. आणखी काही दिवस उष्णलहरी कायम राहणार असल्याचीही वेदशाळेने वर्तविली आहे. नवतपा प्रारंभ व्हायला सहा दिवसांचा कालावधी क्षुल्लक असतानाच भंडारा जिल्ह्यात यावर्षी आजच्या तापमानाच्या नोंदीने उच्चांक गाठला आहे.
आतापर्यंत उष्माघाताचे चार बळी
मे महिन्याच्या प्रारंभीच तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले. याचाच परिणाम उष्माघाताच्या रूपाने दिसून आला. उष्माघातामुळे महिन्याभरात जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत पावणारे चारही व्यक्ती या रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुर आहेत. रणरणत्या उन्हात रोजगार हमीच्या कामात जात असल्यामुळेच काही ठिकाणी कामाच्या वेळाही बदलविण्यात आल्या आहेत. मात्र उन्हाचे चटके मानवी आरोग्यावर परिणाम करीत असल्याचे ज्वलंत उदाहरण आहे.