भंडारा पोलिसांचा ‘अॅप’ लवकरच
By Admin | Updated: February 12, 2016 01:21 IST2016-02-12T01:21:20+5:302016-02-12T01:21:20+5:30
जिल्ह्यात पोलीस व नागरिकांमधील समन्वय वाढविण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला प्रभावी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

भंडारा पोलिसांचा ‘अॅप’ लवकरच
समन्वयासाठी पुढाकार : पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची माहिती
भंडारा : जिल्ह्यात पोलीस व नागरिकांमधील समन्वय वाढविण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला प्रभावी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मोबाईलमध्ये डाउनलोड करता येऊ शकतो, असा ‘अॅप’ लवकरच सुरू करणार असून हा अॅप १५ दिवसात सुरू होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, पोलीस प्रशासनाची कार्यप्रणाली पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यात काही प्रभावी पाऊल उचलले जात आहे. यात नागरिकांशी सुसंवाद करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटस, फेसबुक, आणि व्हाट्सअॅप वर जिल्हा पोलीस प्रशासनाचा अकाऊंट सुरू करण्यात आला आहे. त्यावरच एका क्लिकवर पोलिसांशी संपर्क होऊ शकतो. यासाठी अॅप बनविण्यात येत आहे. या सुविधांच्या उपयोगामुळे नागरिकांना सहजरित्या पोलिसांना तक्रारी देता येऊ शकते.
पोलीस ठाण्यात आजही प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीरित्या होऊ शकत नसल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि कामचुकारपणा केला तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कामात हयगय केल्याप्रकरणी मागील महिन्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असून अन्याय झाला तर जनतेने निसंकोचपणे तक्रार नोंदविण्यासाठी समोर यावे, असे आवाहन केले. (जिल्हा प्रतिनिधी)