भंडारा : १९४२ चे चलेजाव आंदोलन

By Admin | Updated: August 9, 2015 00:57 IST2015-08-09T00:57:47+5:302015-08-09T00:57:47+5:30

स्वातंत्र्याच्या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील अनेक वीरपुत्रांना हौतात्म्य आले. १९४२ च्या चलेजाव ...

Bhandara: Movement of the 1942 movement | भंडारा : १९४२ चे चलेजाव आंदोलन

भंडारा : १९४२ चे चलेजाव आंदोलन

भंडारा : स्वातंत्र्याच्या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील अनेक वीरपुत्रांना हौतात्म्य आले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनादरम्यान तुमसर व भंडारा येथे गोळीबार झाला. त्यामध्ये तुमसरचे सहा जणांना वीरमरण आले. त्यात १३० जखमी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व माकडे गुरुजी, नत्थू चौधरी, कर्मवीर बापू पाठक, दामले गुरुजी, बुधराम देशमुख, नारायण कारेमोरे, नारबाजी पाटील, भिवाजी लांजेवार, सदाशिव किटे, कृष्णाबाई वैद्य, सुमित्राबाई ठाकूर, बाळाजी पहलवान, महादेव लेंडे, किसन भस्मे, पांडुरंग कुंभलकर, वासुदेव कोंडेवार, वा.गो. कुळकर्णी, प्रभाकर पेंढारकर, आनंदराव चकोले, हरिश्चंद्र भोले, सीताराम कारेमोरे यांनी केले होते.
सन १९४२ च्या स्वतंत्रता आंदोलनात भटू रामाजी लोंदासे, श्रीहरी काशिनाथ फाये (करडी), पांडुरंग परसराम सोनवाने, भुवाजी बालाजी भानोरे, राजाराम पैकुजी धुर्वे (भंडारा) हे शहीद झाले. उपस्थित लोकांनी शोकमग्न वातावरणात अंत्ययात्रा काढून डोंगरला नाला येथे येवून अग्नी देताना ‘भारत माता की जय’ च्या जल्लोषात घोषणा दिल्या.
तो नागपंचमीचा दिवस होता. त्यावेळी पोलिसांनी अनेक घरांची झडती घेतली. दरम्यान भो.म. लांजेवार यांच्या निवासस्थानी बुलेटीन व पत्र मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. दामले गुरुजी, नारायण कारेमोरे, सदाशिव किटे, वासुदेव कोंडेवार, नारबाजी पाटील, वा.गो. कुळकर्णी यांना ताब्यात घेऊन भंडारा व जबलपूर येथील तुरुंगात पाठविण्यात आले.
मोहाडी येथे नियमित प्रभातफेरी व ध्वज वंदन कार्यात पुनाजी वनवे, नामदेव भुरे, देवनाथ निमजे,
किसन गोपाल डागा, सुरजरतन डागा, तेजराम गुरुनाथ श्रीपाद अग्रेसर होते. लक्ष्मणराव घोटकर हे सेनेत दाखल झाले होते. आंदोलनादरम्यान ते जापान येथे कैदी असताना ‘आझाद हिंद फौज’मध्ये भरती झाले. तुमसर, येरली, आंधळगाव, सिहोरा, मोहाडी, देव्हाडी, मोहगाव, वडेगाव, सुकळी, मुंढरी आदी गावातून २०० लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर दंड आकारण्यात आला. भंडारा येथील कारागृह अपूर्ण पडल्याने आंदोलनकर्त्यांना जबलपूर, रायपूर येथील कारागृहात पाठविण्यात आले. देव्हाडी येथे ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान आठवडी बाजारात आयोजित सभेत रामचंद्र फाये व पन्नालाल यांनी मार्गदर्शन केले. रेल्वे स्थानक जाळण्याचे निश्चित केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
भंडारा येथे झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ शहीद मैदान येथे आयोजित सभेत बाबा जोशी यांच्या भाषणामुळे देशभावना जागृत झाली. आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व गोळीबार केला. त्यामध्ये महादेव गणबा गजापुरे, गोपाल गणपत चुटके व झिटोबा गोसावी हे शहीद झाले. काही जखमी झाले. मन्रो हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी ध्वज हातात घेऊन निषेध मोर्चा काढला. पोलिसांनी नगर परिषदेची कचरा गाडी आणून पार्थिव उचलले.
तेव्हा शेंदुर्णीकर यांनी पोलिसांशी वाद घालून मृतदेह ताब्यात घेऊन सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. बाबा जोशी, प्रभावती जकातदार, मुनीश्वर शास्त्री यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांमध्ये हर्देनिया बंधू, नंदलाल पशिने, भैय्या जोशी, भैय्या बोहटे, वसंत पवार, बाळ टेंभेकर, सूरजलाल साव, नंदकिशोर मिश्रा, गोकुळप्रसाद मिश्रा व तिवारी बंधू यांनी भाग घेतला.
या घटनेत २० लोकांना ताब्यात घेण्यात आले. अड्याळ, पवनी या परिसरात नारायण बालाजी देशकर यांच्या अध्यक्षतेखाली कमेटी स्थापन करण्यात आली.

Web Title: Bhandara: Movement of the 1942 movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.