कचऱ्यात हरविले भंडारा

By Admin | Updated: September 26, 2015 00:35 IST2015-09-26T00:35:59+5:302015-09-26T00:35:59+5:30

साफसफाई, जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण भंडारा शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरत आहे.

Bhandara lost in the trash | कचऱ्यात हरविले भंडारा

कचऱ्यात हरविले भंडारा

भंडारा : साफसफाई, जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण भंडारा शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरत आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्याऐवजी चक्क रस्त्या-रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्यात भंडारा शहर हरवून गेले की काय? असे वाटत आहे. लक्षावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या शहराची ही दुरवस्था शहराच्या विद्रुपतेत भर घालत आहे.
अगदी बाराही महिने अस्वच्छता आणि तुंबलेल्या नाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरात नगर परिषदेने स्वच्छता मोहीम राबवून बऱ्यापैकी साफसफाई केली होती काय हे पण निश्चितपणे कुणी सांगू शकत नाही. आज स्वच्छता केली तर दुसऱ्या दिवशी भंडाराचे रस्ते पुन्हा कचऱ्याने माखू लागते. शहरातील रस्त्यांवर कचराच कचरा दिसून येतो. जिल्हाधिकारी चौकापासून ते शास्त्रीनगर चौकापर्यंत आणि महात्मा गांधी चौकापासून तर जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यांवर घाण पसरली आहे. सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावर किती कचरा साचलेला आहे याची कल्पनाच येत नाही. भंडारा शहरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसतात.
कापडाच्या तसेच विविध वस्तूंच्या दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची पॅकिंग असणारे पुठ्ठे, प्लॅस्टिकचे कव्हर, कागदी कव्हर, छोट्या कॅरीबॅग असा कितीतरी प्रकारचा कचरा रस्त्यावर साचलेला दिसत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर नागरिकांनी टाकलेला हा कचरा कमी होता म्हणून की काय प्रत्येक दुकानदाराने दुकानातून निघालेल्या कचऱ्याचा ढिगारा दुकानासमोरच लावून ठेवलेला दिसतो. कधीकधी हा ढीग एका ठिकाणी गोळा केला जातो. रस्त्यावर विखुरेला कचरा आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचे ढिगारे पाहून शहर कचऱ्यात हरविल्याचा भास होत आहे. मात्र या कचऱ्याची सवय असणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. किमान आपल्या दुकानासमोर तरी कचरा राहू नये म्हणून त्या कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याची तसदी घेताना कोणीही दिसत नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Bhandara lost in the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.