भंडारा गारठला, पारा ७.८ अंशावर
By Admin | Updated: December 27, 2015 03:03 IST2015-12-27T00:50:09+5:302015-12-27T03:03:15+5:30
अर्धा हिवाळा संपत आला तरी थंडीचा पत्ता नव्हता. दिवसा कडक उन्ह आणि रात्री गारवा असे विषम वातावरण होते.

भंडारा गारठला, पारा ७.८ अंशावर
दिवसभर हुडहुडी : शेकोट्या पेटल्या, ऊबदार कपड्यासाठी गर्दी
भंडारा : अर्धा हिवाळा संपत आला तरी थंडीचा पत्ता नव्हता. दिवसा कडक उन्ह आणि रात्री गारवा असे विषम वातावरण होते. सर्वांनाच थंडीची प्रतीक्षा असताना दोन दिवसापासून थंडीचा जोर वाढला. एकदम आलेल्या थंडीच्या या लाटेने सर्वांनाच हुडहुडी भरली. शुक्रवारी पारा नऊ अंशांपर्यंत खाली घसरला असतानाच शनिवारला पारा ७.८ अंशावर घसरला. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
२४ डिसेंबरच्या रात्रीपासूनच जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. दिवसाच्या तापमान मोठ्या प्रमाणात घसरले. यावर्षीच्या तापमानातील ही सर्वात मोठी घट आहे. यामुळे दिवसभर नागरिक उबदार कपडे घालून वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चहा टपरीमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळाली. दिवसाचे तापमान २०.५ अंश सेल्सियसपर्यंत राहीले. थंडीच्या लाटेचा फायदा रबी पिकांना होणार आहे. ही लाट किती दिवस कायम राहते, यावर रबीच्या पिकांचे उत्पादन अवलंबून राहणार आहे. वाढलेल्या थंडीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानामध्ये उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. (जिल्हा प्रतिनिधी)