भंडारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप
By Admin | Updated: August 24, 2015 00:49 IST2015-08-24T00:49:44+5:302015-08-24T00:49:44+5:30
येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हा पोलीस पावसाळी क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.

भंडारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप
भंडारा : येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हा पोलीस पावसाळी क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा समारोप कार्यक्रम रणजी खेळाडू हेमंत वसू यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी विविध संघातील खेळाडूंनी पथसंचालन करून मानवंदना दिली. पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी सांगून खेळाडूंना मार्गदर्शन केले.
भंडारा जिल्हा पोलीस दलातील उपविभाग भंडारा, पवनी, साकोली, तुमसर तसेच पोलीस मुख्यालय भंडारा आदी चमूमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. झालेल्या स्पर्धांमध्ये विजेत्या खेळाडूंना हेमंत वसू व पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. जनरल चॅम्पियनशिपचा मानकरी पोलीस मुख्यालय भंडारा संघ ठरला. बेस्ट अॅथलेटीक पुरुषांमध्ये राहुल राऊतू व महिलांमध्ये जयश्री उपरीकर यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबड्डी, खोखो, गोळाफेक, भालाफेक आदी खेळांमध्ये प्रथम आलेल्या विजयी चमूंना तसेच प्रथम आलेल्या महिला व पुरुष खेळाडूंना सुद्धा पारितोषिके देण्यात आली. पोलिसांच्या कुटुंबियांकरिता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. हेमंत वसू यांनी ज्या खेळाडूंना विजय संपादन करता आले नाही. त्यांनी येणाऱ्या स्पर्धामध्ये कठोर परिश्रम घेऊन विजय संपादन करावा, असे मार्गदर्शन केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी खेळाडूंनी येणाऱ्या स्पर्धामध्ये जास्तीत जास्त पारितोषिके जिंकून भंडारा जिल्हा पोलीस दलाचे नाव उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) पी.पी. धरमशी, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा मारोती शेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, प्रकाश बुरडे, पोलीस निरीक्षक कोलवाडकर, अशोक लोळे, धात्रक, जगदाळे, तेंदुलकर, चौधरी तसेच सर्व शाखेचे पो.स्टे. चे पोलीस अधिकारी, कर्मचारी, कवायद निर्देशक, पंच व अतिथी उपस्थित होते. संचालन आरती देशपांडे व मपोशि योगिनी नाकतोडे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)