भंडारा शहर ठरतेय ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 05:00 AM2020-09-08T05:00:00+5:302020-09-08T05:00:18+5:30

आतापर्यंतच्या रुग्णसंख्येपैकी एकट्या भंडारा तालुक्यात १०४९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७५७ रुग्ण फक्त भंडारा शहरात आढळले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क न वापरणे व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांना तिलांजली दिली जात असल्याने कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Bhandara city to be 'hotspot' | भंडारा शहर ठरतेय ‘हॉटस्पॉट’

भंडारा शहर ठरतेय ‘हॉटस्पॉट’

Next
ठळक मुद्देशहरात ७५७ रुग्ण : जिल्ह्यात आतापर्यंत २१०६ कोरोनाबाधित, सोमवारी १०३ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जाणकारांचा अंदाज खरा ठरत असून दिवसेंगणिक कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यातून भंडारा शहर कोरोना रुग्णांच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१०६ कोरोनाबाधीत आढळले असून त्यापैकी फक्त भंडारा शहरात ७५७ रुग्ण आहेत. यावर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
शनिवारी १३८, रविवारी ११९ तर सोमवारी १०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतच्या रुग्णसंख्येपैकी एकट्या भंडारा तालुक्यात १०४९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७५७ रुग्ण फक्त भंडारा शहरात आढळले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क न वापरणे व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांना तिलांजली दिली जात असल्याने कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजाराबाबत गांभीर्य कमी व भीती जास्त निर्माण केली जात असल्याने आजार ‘कम्युनिटी स्प्रेड’ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्वयंशिस्तता ढासळल्यानेच रुग्णांचे प्रमाण बळावले आहे. परिणामी भंडारा शहर हॉटस्पॉट शहर म्हणून गणले जात आहे. अनलॉक टप्प्यातील प्रक्रिया सुरू होताच नागरिकही मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यातही नियमांना फाटा दिला जात असल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. स्थानिक प्रशासन वारंवार आवाहन करीत असले तरी नागरिक त्याला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी यावर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून येत्या काही दिवसात कठोर लॉकडाऊन करण्याच्या भूमिकेत आहे.

१४ ०९० व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन तपासणी
आरोग्य विभागाच्यावतीने आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४०९० व्यक्तींची अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे तपासणी करण्यात आली आहे. यात १२ हजार ६६६ व्यक्ती निगेटिव्ह आढळले असून १४२४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत तीव्र श्वासदाहाचे १८२ व्यक्ती फ्युओपीडीमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी ९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. १७३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आहेत.

१२ पालिका कर्मचारी पॉझिटिव्ह
भंडारा शहर कोरोना रुग्णाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत असताना भंडारा पालिकेतील १२ कर्मचारीही कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. यात पाच अभियंते, तीन बाबू, दोन सफाई कामगार व दोन आरोग्य परिचारिकांचा समावेश आहे. परिणामी पालिकेत ८ व ९ सप्टेंबरला सामान्य नागरिकांसाठी प्रवेशावर प्रतिबंध घातला आहे.
सोमवारी १०३ व्यक्ती पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
सोमवारी जिल्ह्यात १०३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१०६ झाली आहे. सोमवारी भंडारा तालुक्यात ६८, लाखांदूर ८, तुमसर १५, पवनी ११ व लाखनी तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. दरम्यान आज ४३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आतापर्यंत १०१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उपचाराखालील रुग्णांची संख्या १०५३ इतकी आहे. तसेच उपचारार्थ दाखल असलेल्या भंडारा तालुक्यातील एका ४३ वर्षीय महिला व पवनी तालुक्यातील पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ३७ झाली आहे.

Web Title: Bhandara city to be 'hotspot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.