भंडारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: November 19, 2014 22:33 IST2014-11-19T22:33:01+5:302014-11-19T22:33:01+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाचा तपास आणि राज्यात दलितांवर वाढलेले अत्याचार याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, बुधवार रोजी

भंडारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा कचेरीवर मोर्चा : दलितांवरील अत्याचार थांबविण्याची मागणी
भंडारा : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाचा तपास आणि राज्यात दलितांवर वाढलेले अत्याचार याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, बुधवार रोजी पुकारलेल्या भंडारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयोजित मोर्चात समता सैनिक दलासह हजारो नागरिक सहभागी झाले.
भंडारा बंद दरम्यान शहरातील प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरात सुरक्षीततेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ११ वाजता येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गांधी चौक, पोष्ट आॅफिस चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडविले. त्रिमुर्ती चौकात मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सभेला महेंद्र गडकरी, डी.एफ. कोचे, अमृत बन्सोड, म.दा. भोवते, निर्मला गोस्वामी, राजकपूर राऊत, प्रिया शहारे, आदींनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावात जाधव कुटूंबातील तिघांची धारदार शस्त्राने अत्यंत कृरपणे हत्या केली. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून विहिरीत फेकण्यात आले. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. महिना उलटला तरी आरोपींना अटक झाली नाही. आरोपींना त्वरीत अटक करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. महाराष्ट्रातील दलित, बौद्ध, अल्पसंख्यांकावर अत्याचार करणाऱ्या दोषींना तत्काळ अटक करण्यात यावी, फेसबुकवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात विकृत व किळसवाणे फोटो घालून व त्याखाली महापुरुषाची विटंबना करणारा संदेश पाठविऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी.
जवखेडे येथील घटनेची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी. या हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अहमदनगर जिल्हा दलित अत्याचार जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, जिल्हास्तरावर दलित अत्याचार निवारण समिती स्थापित करण्यात यावी, अत्याचारग्रस्त दलित, बौद्ध व अल्पसंख्याकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्च्याला संबोधीत केल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन सोपविले. मोर्च्यात महेंद्र गडकरी, डी. एफ. कोचे, असित बागडे, सुरेश सतदेवे, एम. आर. राऊत, उपेंद्र कांबळे, म.दा. भोवते, निर्मला गोस्वामी, राजकपूर राऊत, प्रिया शहारे, आहूजा डोंगरे, निशांत राऊत, शैलेश मयूर, गुलशन गजभिये, अचल मेश्राम, अरुण अंबादे, पुष्पा बंसोड, वामन मेश्राम, कैलास गेडाम, मदनपाल गोस्वामी, किशोर मेश्राम, रत्नमाला वैद्य, माया उके, क्रिष्णा भानारकर, क्रिष्णा कराडे, लिला बागडे, अमोल मेश्राम यांच्यासह शेकडो बौद्ध बांधव सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)