खबरदार! कोविड तपासणी करा, अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST2021-03-25T04:33:25+5:302021-03-25T04:33:25+5:30
वरठी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीला सरपंच श्वेता येळणे, उपसरपंच सुमित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास मेश्राम, तहसीलदार बोंबर्डे, ...

खबरदार! कोविड तपासणी करा, अन्यथा कारवाई
वरठी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीला सरपंच श्वेता येळणे, उपसरपंच सुमित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास मेश्राम, तहसीलदार बोंबर्डे, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसारे, ग्रामविकास अधिकारी दिगंबर गभने, मंडळ अधिकारी विजय ब्राह्मणकर, तलाठी पराग तितीरमारे, ग्रामपंचायत सदस्य योगेश हटवार, अतुल भोवते आणि व्यापारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणीबाबत व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला वेळेवर आळा घालण्यासाठी सुपर स्प्रेडर म्हणून गावातील प्रत्येक दुकानदार व त्यांच्या दुकानात कार्यरत व्यक्तींची कोरोना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. यात हयगय करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून दुकाने सील करण्याचा इशारा देण्यात आला.
ग्रामपंचायतीमार्फत एक आठवड्यापासून सूचना देण्यात आल्या. पण, दुकानदारांनी याकडे पाठ फिरवली आहे. सध्या वरठी येथे कोरोनासदृश्य लक्षणे असणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सर्वांनी तपासणी करून सहकार्य करावे व कारवाई टाळावी, अशी विनंती सरपंच श्वेता येळणे यांनी केली आहे.
बॉक्स
घाबरू नका, उपचार शक्य
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी हा एकमेव उपाय आहे. दुखणे अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे. वेळेवर उपचार व सतर्कता एकमेव उपाय आहे. नागरिकांनी गैरसमज बाजूला सारून तपासण्या कराव्यात. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. पण, लसीकरणाची गती मंदावली आहे. लसीकरणाचा लाभ घेऊन प्रत्येकाने स्वतःची कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी केले आहे.