Better a poor horse than no horse at all. | शहरात उपाशी मरण्यापेक्षा आपल्या गावाकडे पोहोचलेलं बरं!

शहरात उपाशी मरण्यापेक्षा आपल्या गावाकडे पोहोचलेलं बरं!

ठळक मुद्देमजुरांना लॅाकडाऊनची भीती : मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याची तयारी

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने सरकार पुन्हा एकदा लाॅकडाऊन करते की काय, या भीतीने रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्याबाहेर गेलेले मजूर पुन्हा एकदा लाॅकडाऊनच्या भीतीने गावाकडे परतू लागले आहेत. अनेक मजूर तर मोठ्या शहरात उपाशी राहून मरण्यापेक्षा गड्या आपल्या गावी लवकरात लवकर पोहोचलेच बरं, असे म्हणत आपले बिऱ्हाड घेऊन मिळेल त्या वाहनाने आपला गाव जवळ करू लागले आहेत. 
भंडारा बसस्थानक, राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या वाहनांमधून कामगार परततानाचे चित्र दिसून येत आहे. 
गतवर्षी मार्च-एप्रिलमध्ये सर्वाधिक झळ ही मजूर कामगारांना बसली होती. याच भीतीने आता पुन्हा आपले व आपल्या कुटुंबीयांचे बेहाल होऊ नयेत म्हणून अनेक मजूर नागपूर, पुणे, औरंगाबाद, अमरावती सारख्या मोठ्या शहरातून आता परत आपल्या गावाकडे जाऊ लागले आहेत. मागील दीड महिन्यापासून कोरोना संसर्गाचा कहर वाढला आहे. त्यामुळे आता प्रशासनही हतबल झाले आहे. 
भंडाऱ्यासारख्या छोट्या जिल्ह्यामध्येही आता दररोज वीस, एकवीस असे मृतांचे दररोज आकडे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शासन केव्हाही लाॅकडाऊन करू शकते. त्यामुळे रोजगाराच्या निमित्ताने गेलेले मजूर मिळेल त्या वाहनासह, एसटी, खासगी बसेस, रेल्वेने गावाकडे परतू लागले आहेत. 
मध्यंतरी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी रोजगारासाठी परत स्थलांतर केले होते. मात्र गतवर्षीचा वाईट अनुभव आणि खाण्यापिण्याचे होणारे वांधे यामुळे अनेकांना भीती सतावत आहे. 

लाॅकडाऊनच्या धास्तीने मजुर सैरभैर

नागपूरला कुटुंबपयांसह रोजगाराच्या निमित्ताने गेलो होतो. मात्र आता सरकार केव्हा लाॅकडाऊन करेल याचा नेम नाही. आमच्या बरोबरचे अनेक कामगार गावाकडे केव्हाच गेले, आम्हीच मागे राहिलो होतो. त्यामुळे आता एसटी बसने आम्ही गोंदियाला निघालो आहोत. गावात काही झाले तरी आपली नातेवाईक तरी  मदतीला धावून येतात.
- विष्णू मेश्राम,
दिघोरी, भंडारा. 

मी नोकरी निमित्ताने पुण्याला होतो. मात्र आता पुण्यातही परिस्थिती वाईट झाली आहे. पुन्हा सर्व बंद झाले तर काय करावे. त्यात कुटुंब गावाकडे आहे. म्हणून आता पुन्हा मी सुध्दा गावाकडेच कायमचा राहण्यासाठी चाललो आहे. गावाताच कामधंदा करणार आहे.
-हरिहर धावडे, मोहाडी

मी औरंगाबादला एका खासगी कामासाठी अनेक वर्षांपासून आहे. मात्र तिथेही आता कोरोनाची भीती  वाढत आहे. माझे कुटुंब आधीच गावाकडे पाठवले आहे. मी एकटाच औरंगाबादला कामासाठी राहत होतो. मात्र  लाॅकडाऊन झाल्यास मोठी अडचण होईल, म्हणून ट्रकने गावाकडे चाललो आहे.
- इरशाद शेख, गोंदिया.

नागपूर - भंडारा- गोंदिया मार्गावर मजुरांची गर्दी 
भंडारा जिल्ह्यात मोठमोठे उद्योग, कारखाने नाहीत. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून कामगार मोठ्या संख्येने भंडारा जिल्ह्यात स्थलांतरित होत नाहीत. मात्र अनेक जण छोट्या-मोठ्या व्यवसायाच्या निमित्ताने जिल्ह्यात येतात. आता हेच विक्रेते पुन्हा लाॅकडाऊनच्या भीतीने आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. 
भंडारा बसस्थानकात तसेच खासगी वाहनातून अनेक जण आपल्या कुटुंबासह गावाकडे परततानाचे चित्र दिसून येत आहे. सरकारने अचानक लाॅकडाऊन केले तर आपली मोठी पंचायत होईल, म्हणून आता काहीच नको, आधी आपण गावाकडे पोहोचू असे मजूर सांगत आहेत. 
भंडारा जिल्ह्यातील अनेक जण रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते, तेही आता पुन्हा एकदा आपल्या गावी परतू लागले आहेत. अनेक मजुरांना  वाटेत असतानाच तर लाॅकडाऊन होणार नाही ना, या भीतीने अनेकजण छोट्या-मोठ्या खासगी खाजगी वाहनांचे बुकिंग करून नागपूर, मार्गावरून रायपूर, गोंदियाकडे परत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

 

Web Title: Better a poor horse than no horse at all.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.