समाजभूषण पुरस्काराने बन्सोड सन्मानित
By Admin | Updated: May 9, 2015 00:44 IST2015-05-09T00:44:29+5:302015-05-09T00:44:29+5:30
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण ....

समाजभूषण पुरस्काराने बन्सोड सन्मानित
भंडारा : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे. मुंबई येथील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ६ मे रोजी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, १५ हजार व चंदनाचा हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, समाज कल्याण संचालक रणजित सिंह देवोल, मुंबईच्या महापौर स्रेहल आंबेकर, सिंधु सपकाळ, डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे, पत्रकार यदू जोशी व प्रभाकर धाकडे आदी उपस्थित होते.
अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती जनजाती, बुद्धिस्ट-आंबेडकरी समाज व इतर मागासवर्गीयांबरोबरच दलित पीडित व वंचितांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, कल्याण व उत्थानाकरिता केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. भंडारा येथील रहिवासी असलेल्या अमृत बन्सोड यांचा मागील ४० वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक यासह प्रबोधन व परिवर्तनवादी चळवळीमध्ये हिरीरीने सहभाग आहे. (प्रतिनिधी)