सोन्याऐवजी मिळाल्या बेंटेक्सच्या बांगड्या

By Admin | Updated: May 16, 2016 00:25 IST2016-05-16T00:25:16+5:302016-05-16T00:25:16+5:30

गहाण ठेवलेले सोने सोडविल्यानंतर मिळालेल्या ऐवजांपैकी बांगड्या बेंटेक्सच्या निघाल्या. तब्बल साडेतीन तोळ्यांपेक्षा जास्त वजनी असलेल्या ...

Benetx bands instead of gold | सोन्याऐवजी मिळाल्या बेंटेक्सच्या बांगड्या

सोन्याऐवजी मिळाल्या बेंटेक्सच्या बांगड्या

युको बँकेतील प्रकार : ग्राहकाची पोलिसात तक्रार, चर्चेला उधाण
भंडारा : गहाण ठेवलेले सोने सोडविल्यानंतर मिळालेल्या ऐवजांपैकी बांगड्या बेंटेक्सच्या निघाल्या. तब्बल साडेतीन तोळ्यांपेक्षा जास्त वजनी असलेल्या या बांगड्या बनावटी निघाल्याने ग्राहकाने पोलिसात तक्रार दाखल केली. हा प्रकार विश्वनाथ भगवान क्षीरसागर रा. सुयोगनगर भंडारा यांच्यासोबत घडला असून त्यांनी यासंबंधीचा व्यवहार युको बँकेसोबत केला आहे.
याबाबत असे की, विश्वनाथ क्षीरसागर यांनी १२ डिसेंबर २०१४ ला नरकेसरी वॉर्डात स्थित युको बँकेत १० तोळे २,१३०मिली ग्रॅम सोने दोन वर्षांसाठी गहाण ठेवले होते. यात सोन्याच्या दोन बांगड्या(३६.२९० ग्रॅम), चपलाकंठी (३९.८१० ग्रॅम), सोन्याची गोप (१९.३८० ग्रॅम), आंगठी (६.६५० ग्रॅम) या ऐवजांच्या समावेश होता. त्यावेळी सोनार सुधिर फाये यांच्या समक्ष ऐवजांची तपासणी करुन सोने गहाण ठेवण्यात आले होते. त्याची मुदत दोन वर्षांकरिता होती. मुदत संपल्यामुळे क्षीरसागर हे गहाण ठेवलेले सोने सोडविण्याकरिता १३ मे २०१६ रोजी बँकेत गेले. यावेळी त्यांनी १ लक्ष ६४ हजार रुपयांची सोडवणूक रक्कमही भरली. मात्र बँकेत ऐवज परत घेताना सोनाराच्या समक्ष ते तपासून घेण्यात आले नाही. ऐवजांची पोटली घेवून ते घरी गेले. सदर ऐवज घरी दाखविल्यानंतर यापैकी बांगड्या ह्या बनावटी असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी पुन्हा बँकेत धाव घेतली. यावेळी बँक प्रशासनाने हात वर केले. तुम्ही सोने तपासून परत नेले. घरी गेल्यानंतर ते सोने तुम्ही बदलविले असा असा युक्तीवाद बँकेतर्फे करण्यात आला.
सोने परत देताना बँकेचे प्रभारी व्यवस्थापक संदीप महादाणे, कॅशीअर पोर्णिमा अडलक यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. मिळालेल्या ऐवजांपैकी सोन्याच्या तीन वस्तु अस्सल आहेत, मात्र बांगड्या बनावटी असल्याचे दिसून आले. बांगड्यांना लॉकरमध्ये ठेवण्यात येत असताना त्या बांगड्या बदलल्या कशा हा प्रश्न निरुत्तरीत आहे. बँक प्रशासनाने विश्वासघात केल्याप्रकरणी क्षिरसागर यांनी भंडारा शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

क्षीरसागर यांना सर्वांसमक्ष सोने परत करण्यात आले. त्यांनी स्वत: ऐवज स्विकारताना ते सोने माझे असल्याचे पटवून घेतले. बँकेतून निघाल्यानंतर जवळपास ते अर्ध्या तासाने बँकेत परत आले. या दरम्यान काही घडले असेल त्यासाठी बँक प्रशासन जबाबदार नाही. गुंतवणूकदारांची संख्या जास्त असल्याने प्रत्येकवेळी सोने परत करताना सोनाराकडून तपासणे अडचणीचे ठरते. मात्र ग्राहकाने मागणी केल्यास ते तपासल्या जाते.
- संदीप महादाणे,
प्रभारी व्यवस्थापक, युको बँक भंडारा

Web Title: Benetx bands instead of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.