‘सिकलसेल’ग्रस्तांना मोफत बससेवेचा लाभ
By Admin | Updated: March 23, 2015 00:48 IST2015-03-23T00:48:35+5:302015-03-23T00:48:35+5:30
सिकलसेलग्रस्त व्यक्तीला व त्याच्यासह एकाला आता रापमच्या बसमध्ये मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

‘सिकलसेल’ग्रस्तांना मोफत बससेवेचा लाभ
भंडारा : सिकलसेलग्रस्त व्यक्तीला व त्याच्यासह एकाला आता रापमच्या बसमध्ये मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. याबाबत राज्य शासनाने १० मार्चला अध्यादेश काढला असून तसे निर्देश राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यात सिकलसेल रूग्णांची मोठी संख्या आहे. लगतच्या गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात सिकलसेलग्रस्तांची मोठी संख्या आहे. त्यातुलनेत भंडारा जिल्ह्यात रूग्णांची संख्या अल्प असली तरी, या योजनेचा लाभ त्यांनाही मिळणार आहे. ५ फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सिकलसेल रूग्णांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करताना कुठलाही शुल्क आकारला जावू नये याबाबत निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयावरून सार्वजनिक आरोग्य विभागाने १० मार्चच्या पत्रानुसार एसटी बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या सिकलसेलग्रस्तांना मोफत प्रवास सुविधा मिळणार आहे.
यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचे सिकलसेलग्रस्त असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. किंवा रूग्णाजवळ जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र नसल्यास रक्तपेढीकडून मिळालेले प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाणार आहे. ही मोफत सेवा ३१ मार्च २०१७ पर्यंतच मिळणार असल्याचा उल्लेख या आदेशात आहे. सिकलसेल ग्रस्तांना औषधोपचारासाठी अनेकदा जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयात खेटा घालाव्या लागतात. रूग्णांना औषधोपचार करण्यासाठी राज्य शासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (शहर प्रतिनिधी)