आम आदमी विमा योजनेपासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 00:31 IST2016-10-30T00:31:19+5:302016-10-30T00:31:19+5:30

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात.

Beneficiaries deprived from common man insurance scheme | आम आदमी विमा योजनेपासून लाभार्थी वंचित

आम आदमी विमा योजनेपासून लाभार्थी वंचित

योजना चांगली : अंमलबजावणीसाठी होते टाळाटाळ
लाखनी : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. परंतु जनजागृतीअभावी व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या योजना ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे योजना चांगली असूनही लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळू शकत नाही.
ग्रामीण परिसरातील नागरिकांसाठी शासनाने सुरु केलेली ‘आम आदमी विमा योजना’ ही चांगली योजना आहे. परंतु जनजागृतीचा अभाव व लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी संबधित कर्मचाऱ्यांची टाळाटाळ करणे यामुळे ग्रामीण भागातील शेकडो नागरिक या योजनेपासून वंचित आहे. ग्रामीण भागातील आम आदमी केंद्रबिंदू मानून शासनाने २००७ मध्ये ‘आम आदमी विमा योजना’ सुरू केली. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील आम आदमी या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांवर कोणताही भार न देता केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी १०० रूपये भरून विमा उतरविला जातो. लाभार्थ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास ३० हजार रूपये, अपघाती मृत्यु झाल्यास ७५ हजार रूपये, अपघातात दृष्टि गेल्यास ७५ हजार रूपये, एक डोळा निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रूपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या वारसास विमा कंपनीकडून दिली जाते. याशिवाय लाभार्थ्यांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यास शिष्यवृत्तीसुध्दा दिली जाते, अशी तरतूद आम आदमी विमा योजनेत केलेली आहे.
सुरूवातीला केवळ भूमिहिन कुटुंबातील लाभार्थीच या योजनेकरिता पात्र ठरत असत. परंतु योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ८ जून २०११ रोजी शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार पाच एकरापेक्षा कमी जिरायती व अडीच एकरापेक्षा कमी बागायती शेतजमिन असलेली म्हणजेच अल्पभूधारक व्यक्तीही या योजनेची लाभार्थी होऊ शकते.
या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबधित तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यात आली आहे. या योजनेबाबत जनजागृतीच केल्या जात नाही. या योजनेची बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत ही योजना खऱ्या अर्थाने पोहोचली नाही. तहसील कार्यालयात या योजनेचे फलकही लागलेले होते. त्या फलकावर या योजनेच्या अधिक माहितीकरिता संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे नमुद करण्यात आले होते. परंतु आता हे फलकही दिसेनासे झाले आहेत. एखाद्याने या योजनेबाबत तलाठी कार्यालयात जावून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला या योजनेबाबत व्यवस्थित माहितीही दिली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Beneficiaries deprived from common man insurance scheme