आश्वासनानंतर वनमजुरांचे उपोषण मागे
By Admin | Updated: August 8, 2015 00:46 IST2015-08-08T00:46:36+5:302015-08-08T00:46:36+5:30
महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटना अंतर्गत साकोली येथील नवेगाव नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रीय ...

आश्वासनानंतर वनमजुरांचे उपोषण मागे
साकोली : महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटना अंतर्गत साकोली येथील नवेगाव नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रीय कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात गुरूवारपासून आमरण उपोषणाला बसलेल्या वनमजुरांना गोंदिया येथील वनाधिकाऱ्यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज शुक्रवारी उपोषणाची सांगता करण्यात आली.
वनविकास महामंडळ भंडाराचे २० हजार हेक्टर क्षेत्र व्याघ्र राखीव क्षेत्रात गेल्याने त्यामध्ये १५ ते २० वर्षापासून कामावर असलेल्या वनमजुर वनकामगारांना कामाअभावी बंद व्हावे लागते. पर्यायाने त्यांना कामावर घेण्यासाठी मागील दोन वर्षापासून चर्चा व पत्रव्यवहार सुरू आहे. तसेच वनसंरक्षक गोंदिया यांनी सदर वनमजुरांना कामावर घेण्यासाठी उपसंचालक व वनक्षेत्रपाल यांचेकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु या अधिकाऱ्यांनी त्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांना कामावर घेतले नाही. वनमजुरांना आठ तास काम देण्याऐवजी त्यांना २४ तास कामावर ठेवल्या जाते. २३ कुटी आणि १२ गेटवर दरदिवशी ३४८ मजुरांची आवश्यकता असताना केवळ १२५ वनमजूर २४ तास कामावर ठेवले जातात. मात्र १५ ते २० वर्षापासून २३३ रिक्त जागावर वनमजुराची नियुक्तीच केली गेली नाही. यासंदर्भात संघटनेतर्फे अनेकवेळा विचारपुस केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले जातात. वनमजुरांचे शोषण केल्या जाते. त्यामुळे वनविकास महामंडळ भंडाराचे २० हजार हेक्टर वनक्षेत्र नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रास हस्तातरीत झाल्याने त्यामध्ये १५ ते २० वर्षापासून काम करणाऱ्या वनमजुरांना नियमित कामावर घेण्यात यावे, वनमजुरांना २४ तास काम देण्याऐवजी ८ तास काम द्यावे, २२३ मजुरांची तात्काळ भरती करण्यात यावी, वनमजुरांचे मजुरीत २६८ वरून २८५ रूपये ते २९८ रूपये एवढी वाढ झाली त्याचे एरीअर्स वाटप करण्यात यावे, वनमजुरांचे पगार बँक खात्यात जमा करावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रव्यवहाराची अवहेलना करण्याचा अधिकाऱ्यांची कार्यालयीन चौकशी करण्यात यावी, अन्यथा हे आमरण उपोषण पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. अखेर आज आश्वासनानंतर उपोषणाची रितसर सांगता करण्यात आली. या उपोषणात शंकर सयाम, ताराचंद कमाने, सुखदेव रामटेके, सुरेश रामटेके, सोपान लुटे, परसमोडे, पुरूषोत्तम सिरसाम सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)