नगरपरिषदेची घोषणा होताच मोर्चेबांधणीला सुरुवात
By Admin | Updated: July 21, 2016 00:24 IST2016-07-21T00:24:58+5:302016-07-21T00:24:58+5:30
बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर साकोली व सेंदूरवाफावासीयांचे नगरपरिषदेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.

नगरपरिषदेची घोषणा होताच मोर्चेबांधणीला सुरुवात
साकोली नगरपरिषद : प्रतीक्षा वॉर्डनिहाय आरक्षणाची
संजय साठवणे साकोली
बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर साकोली व सेंदूरवाफावासीयांचे नगरपरिषदेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. शासनाने नुकतीच साकोली नगरपरिषदेची औपचारिक घोषणा केली अन् नगरसेवक व नगराध्यक्षासाठी मोर्चेबांधणी सुरु केली. प्रतीक्षा आहे ती केवळ आरक्षण सोडतीची.
साकोली व सेंदूरवाफा या दोन्ही गावामिळून साकोली नगरपरिषदेची औपचारिक घोषणा राज्याचे राज्यपाल यांनी केली. या घोषणेनंतर दोन्ही ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली. आता साकोली व सेंदूरवाफा या दोन्ही गावांचा कारभार तहसीलदार यांच्याकडे आहे. नगरपरिषदेची घोषणा होताच दोन्ही गावांची लोकसंख्या पुन्हा विचारण्यात आली.
साकोलीची लोकसंख्या १४ हजार ६३६ एवढी असून सेंदूरवाफा गावाची लोकसंख्या ही १० हजार २५४ एवढी असून दोन्ही गावाची एकूण लोकसंख्या ही २४ हजार ८९० एवढी आहे. यात साकोलीची लोकसंख्या ही सेंदूरवाफापेक्षा ४ हजार ३८२ एवढी जास्त आहे. नगरपरिषदेची घोषणा होताच सर्व पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरु झाली असून सर्वांना आरक्षण सोडतीची प्रतीक्षा आहे. नगरपरिषदेसाठी एकूण १७ प्रभाग असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील जुनी व राजकीयदृष्ट्या महत्वाची म्हणून साकोली नगरपरिषदेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागणार आहे. खासदार प्रफुल पटेल, खासदार नाना पटोले, आ.बाळा काशीवार, आ. राजेंद्र जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा काँग्रेस कमेटीचे सचिव डॉ.ब्रम्हानंद करंजेकर आदी मंडळी तिकीट वाटपाची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. पक्षांमधील कार्यकर्त्यात उत्सुकता दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, हेमकृष्ण वाडीभस्मे, प्रदीप मासुरकर, डॉ.अनिल शेंडे, नरेंद्र वाडीभस्मे, हेमंत भारद्वाज, रवी राऊत, कौसलताई नंदेश्वर, सुरेखा शहारे, सविता शहारे, सुरेशसिंह बघेल, शारदा वाडीभस्मे, लता दुरुगकर यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून बंडू बोरकर, आणिक निंबेकर, मोहन चांदेवार, किशोर पोगळे, नितीन खेडीकर, मंदार खेडीकर, मनिष कापगते, महादेव कापगते, अरुण बडोले, धनवंता राऊत तर काँग्रेसकडून अश्विन नशिने, डॉ.अजय तुमसरे, दिलीप मासूरकर, ताराबाई तरजुले, क्रिष्णा मेश्राम, विजय दुबे, दिपक रामटेके, मनोहर डोंगरे यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा असली तर आरक्षणानंतर चित्र स्पष्ट होणार असून पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत.
आता नावासाठी संघर्ष
साकोली नगरपरिषदेचे नाव साकोली सेंदूरवाफा असे ठेवण्यात यासाठी सर्वपक्षीय संघर्ष सुरु आहे. त्यामुळे नावात बदल होते की त्याच नावावर नगरपरिषद राहते याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.
साकोली नगरपरिषदेची घोषणा झाली असली तरी या नगरपरिषदेचे मुख्य कार्यालय हे साकोली की सेंदूरवाफा हे अजून निश्चित झाले नाही. दोन्ही गावाच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालये ही दुमजली इमारतीत आहेत. त्यामुळे कार्यालय कुठे याची निश्चित जागा अजूनपर्यंत ठरली नाही. आदेशात कार्यालय कुठे राहील अशी माहिती नसून सध्या दोन्ही ठिकाणी कामे सुरु आहेत. मात्र नवीन बॉडी अस्तित्वात आल्यावर ते कार्यालय कुठे ठेवायचे हे ठरवू शकतात, असे तहसीलदार ए.डब्लू. खडतकर यांनी सांगितले.