अंत्ययात्रेवर मधमाश्यांचा हल्ला

By Admin | Updated: January 28, 2016 00:29 IST2016-01-28T00:29:03+5:302016-01-28T00:29:03+5:30

वृद्ध नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांवर मधमाश्यांनी हल्ला केला.

Bees attack on funerals | अंत्ययात्रेवर मधमाश्यांचा हल्ला

अंत्ययात्रेवर मधमाश्यांचा हल्ला

५० जण जखमी : कऱ्हांडला येथील घटना, जखमीत महिलांसह बालकांचाही समावेश
कऱ्हांडला : वृद्ध नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. यात सुमारे पन्नास जण जखमी झाल्याची घटना कऱ्हांडला येथे सोमवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
कऱ्हांडला येथील पांडुरंग शहारे यांचे मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांवर मधमाश्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये गीता ढोरे (५५), सुरेश शहारे (३०), गणेश ठाकरे (३५), वर्षा शहारे (३०), केशव खोब्रागडे (६०) हे गंभीर जखमी झाले असून भोला देशमुख (३५), गोवर्धन थेरे (३५), नीलेश पिलारे (२५), राजू पिलारे (३५), लक्ष्मण देशमुख (४५), मिरा हेमणे (६०), महादेव शहारे (६५), युवराज शहारे हे जखमी झाले असून अन्य जखमी हे बाहेरगावचे असल्याने त्यांची नावे कळू शकली नाही. मधमाश्यांच्या या हल्ल्यात सुमारे ५० जण जखमी झाले आहेत.
अंत्यसंस्कारासाठी पांडुरंग शहारे यांचे शव स्मशानभूमीकडे नेण्यात येत होते. दरम्यान अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव विसाव्यावर ठेवण्यात आले. विसाव्याच्या ठिकाणी असलेल्या झाडावर मधमाश्यांचे पोळे असल्याची कल्पना कुणालाही नव्हती. अंत्ययात्रेतील एकाने फटाका फोडला. तोच झाडावर असलेल्या मधमाशा अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांवर तुटून पडल्या. अचानक मधमाशांनी हल्ला चढविल्याने अंत्ययात्रेतील सहभागी महिला व पुरुष, बालक, वयोवृद्ध जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले. अनेकांनी जवळच असलेल्या शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यात तर कुणी चणा-वाटाणा, गव्हाच्या पिकात आश्रय घेतला. या हल्ल्यात मधमाश्यांनी अनेकांना आपला दंश मारून जखमी केले. मधमाश्यांच्या हल्ल्यातून सुटण्यासाठी काहींनी समयसूचकता दाखविली. जवळच असलेले तणसीचे ढिगारे पेटविले. यामुळे काही वेळाने मधमाशा शांत झाल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यातील अनेकांना किरकोळ जखमा झाल्याने सुटी देण्यात आली. यानंतर मृतक पांडूरंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Bees attack on funerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.