सुंदर माझं घर, स्वच्छ परिसर
By Admin | Updated: November 26, 2015 00:39 IST2015-11-26T00:39:51+5:302015-11-26T00:39:51+5:30
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतीने ग्रामवासीयांसाठी एका अभिनव उपक्रमाची घोषणा केली.

सुंदर माझं घर, स्वच्छ परिसर
देव्हाडा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
हजारोंचे बक्षीस : ग्रामसभेतून निरीक्षण समितीची निवड
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतीने ग्रामवासीयांसाठी एका अभिनव उपक्रमाची घोषणा केली. सुंदर माझं घर, स्वच्छ परिसर असे त्या उपक्रमाचे नाव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून या अभिनव उपक्रमाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत स्पर्धेत सहभागी ग्रामस्थांच्या वर्षभरातील कामकाजांचे परिक्षण ग्रामसभेतून निवड झालेल्या समितीकडून होणार आहे. यशस्वी ग्रामस्थांना स्वातंत्र्यदिनी बक्षीसांचे वितरण केले जाणार आहे.
वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या तीन हजार लोकसंख्येच्या गावात जून २०१५ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. गावकऱ्यांनी सत्ता परिवर्तन करीत विद्यमान उपसरपंच महादेव फुसे, दिनदयाल बोंदरे यांच्या पॅनलला सत्तारूढ केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गावात आरोग्य व शांतता नांदावी, या हेतूने एका अभिनव उपक्रमाची योजना आखली. या उपक्रमाला नाव दिले. सुंदर माझं घर, स्वच्छ परिसर या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून उदंड प्रतिसाद लाभत आहे.
कुटूंबांना हजारो रूपयांचे बक्षीसही दिले जाणार आहे. २ आॅक्टोंबरपासून सुरू झालेल्या उपक्रमांचे बक्षीस १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांना दिले जाणार आहेत. सरपंच विणा पुराम, उपसरपंच महादेव फुसे, ग्रामसेवक तभाणे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभत आहे. अनेक ग्रामपंचायतीची या उपक्रमाविषयी विचारणा होत असून अशाच प्रकारचा उपक्रम आपल्या गावात राबविण्याचा मानस व्यक्त करीत आहेत. देव्हाडा ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असून ग्रामपंचायतीच्या हद्दीत वैनगंगेच्या पवित्र पावन पात्रात नरसिंह भगवानाचे प्रसिद्ध मंदिर आहे. वैनगंगा साखर कारखाना व गुरांचा प्रसिद्ध बाजार याच गावात भरत असून तुमसर ते गोंदिया, तुमसर-देव्हाडा-साकोली मार्गावर गाव वसलेले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरीक पाहणीसाठी येत आहेत. (वार्ताहर)