मारहाणीत तुटला इसमाचा पाय
By Admin | Updated: June 5, 2016 00:23 IST2016-06-05T00:23:17+5:302016-06-05T00:23:17+5:30
लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील घोडेझरी येथील रहिवासी भाऊराव सार्वे हे धान्य दुकानात धान्य घेण्याकरिता गेले

मारहाणीत तुटला इसमाचा पाय
धान्य घेण्यावरून वाद : आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील घोडेझरी येथील रहिवासी भाऊराव सार्वे हे धान्य दुकानात धान्य घेण्याकरिता गेले असता त्या दुकानदाराचे नातेवाईक असलेले सरपंच सुधीर राघोेर्ते याने शाब्दीक वाद घालून पावड्याने भाऊराव सार्वे यांच्या डाव्या पायावर मारहाण केली. यात सार्वे यांच्या पायाचा हाड मोडला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. त्यानंतर पोलीस पाटील सुनिल लुटे यांच्या मदतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.
पालांदूर पोलीस ठाण्याअंतर्गत घोडेझरी येथील भाऊराव सार्वे हे एकटेच घरी राहत होते. हलाखीची परिस्थिती असल्याने पत्नी व मुलगा पहेला येथे मागील १० वर्षापासून स्थायिक झाले आहेत. कुटुंब तिकडे व भाऊराव इकडे अशा अवस्थेत जगणे सुरु होते. घटनेच्या दिवशी भाऊराव धान्य घेऊन येताना सरपंच सुधीर राघोर्ते याच्याशी शाब्दीक बाचाबाची झाली. वादादरम्यान राघोर्तेने सार्वे यांच्या पायावर पावड्याने वार केल्यामुळे त्यांचा हाड मोडला. जखमीचा मुलगा प्रयाग भाऊराव सार्वे (२२) रा.पहेला याला सांगण्यात आली. प्रयागने भंडारा गाठले. त्यानंतर पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पालांदूर पोलिसांनी भादंवि ३२५, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात सार्वे कुटुंबीयांनी पत्रपरिषदेत घटनेची माहिती देऊन आरोपीविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली. (वार्ताहर)
घटनास्थळाला भेट दिली असता घटनास्थळावर रक्ताचे डाग आढळले नाही. प्रत्यक्ष पंच, साक्षीदार, पुरावे मिळाल्यास कारवाई करण्यात येईल. तपास सुरु असून घटनेकडे लक्ष लागले आहे.
- एच. एम. सय्यद,
ठाणेदार, पालांदूर