शिक्षण सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्याचे माध्यम व्हावे
By Admin | Updated: November 27, 2014 23:28 IST2014-11-27T23:28:50+5:302014-11-27T23:28:50+5:30
कला ही पुढे उड्डाण उद्योजकता रुपात असायला हवी. आपली स्पर्धा ही आपल्याशीच असते. वैचारिक क्रांती घडविण्यासाठी युवकांमध्ये शिस्त व वेळेचा सदुपयोग करण्याची चिकाटी असावी.

शिक्षण सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्याचे माध्यम व्हावे
जवाहरनगर : कला ही पुढे उड्डाण उद्योजकता रुपात असायला हवी. आपली स्पर्धा ही आपल्याशीच असते. वैचारिक क्रांती घडविण्यासाठी युवकांमध्ये शिस्त व वेळेचा सदुपयोग करण्याची चिकाटी असावी. त्यासाठी शिक्षण हे परिक्षार्थी ऐवजी सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्याचे माध्यम असायला हवे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले.
परसोडी येथे युवा बिरादरी परसोडीला १० वर्षे पूर्ण करीत असलेल्या दशक सोहळ्यात त्या बोलत होत्या. उद्घाटन उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, तहसीलदार तेलंग, जिल्हा परिषदेचे माजी राजकपूर राऊत, सरपंच मंजुळा वंजारी, भोजराम वैरागडे, रघुपती फंदे, तलाठी क्षीरसागर, नरेंद्र लेंडे, मोतीलाल येळणे आदी उपस्थित होते. डॉ.खोडे म्हणाले, आपलं देवावर विश्वास श्रद्धा असावं. मात्र श्रद्धा ही अंधश्रद्धा होऊ नये. दैनंदिन जीवनात विज्ञाननिष्ठ विचारांची देवाणघेवाण करावी. यातच आधुनिक नव समाज निर्मितीला बळ मिळतो.
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी घोडेस्वार म्हणाले अज्ञानी लोकांना ज्ञानी बनवावे. गावाचं पालकत्व घ्यावे आणि शासनाचे योजना कलेच्या माध्यमातून तळागाळातील घटकापर्यंत पोहचवावे. तेव्हाच पालकत्व घेतल्याचे फलीत होईल.
तत्पूर्वी सकाळी संत गाडगेबाबा यांच्या विचाराची वृक्ष व स्वच्छता दिंडी गावात काढण्यात आली. युवा बिरादरीचे कलावंत यांनी दिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छता, पाणी वाचवा याविषयावर संगीतमय पथनाट्य ठिकठिकाणी सादर केले. दिंडीमध्ये जि.प. प्राथमिक शाळा, पराग प्राथमिक शाळा, साईराम शाळा, ओम सत्य साई महाविद्यालय परसोडीचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व गावकरी उपस्थित होते. युवाबिरादरीद्वारे गाव स्वच्छ करण्यात आले. यात सर्वांनी हिरहिरीने सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दिंडीचा समारोप करण्यात आला.
दुपारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले. समाजप्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आले. (वार्ताहर)