नक्षलग्रस्त भत्त्याबाबत शिक्षकांशी सापत्न वागणूक

By Admin | Updated: November 11, 2015 00:29 IST2015-11-11T00:29:02+5:302015-11-11T00:29:02+5:30

शिक्षण विभागाने शिक्षकांवर सोपविलेली विद्यार्जनाची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळीत आहेत. मात्र, त्यांना देय भत्त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.

Be kind to the teachers about naxalites | नक्षलग्रस्त भत्त्याबाबत शिक्षकांशी सापत्न वागणूक

नक्षलग्रस्त भत्त्याबाबत शिक्षकांशी सापत्न वागणूक

२००६ पासून शिक्षक वंचित : लाखांदूर, लाखनी तालुक्यातील ६५० शिक्षकांवर अन्याय
भंडारा : शिक्षण विभागाने शिक्षकांवर सोपविलेली विद्यार्जनाची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळीत आहेत. मात्र, त्यांना देय भत्त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिक्षकांना नक्षलग्रस्त विशेष भत्ता प्राप्त होत आहेत. परंतु, लाखांदूर व लाखनी तालुक्यातील सुमारे ६५० शिक्षकांसोबत २००६ पासून सापत्न वागणूक सुरू असून त्यांना नक्षल भत्त्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले आहे.
जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर व लाखनी हे तीन तालुके नक्षलग्रस्त घोषीत करण्यात आलेले आहे. यामुळे या तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मुळ वेतनाच्या १५ टक्के किंवा १,५०० रूपये एवढा नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता लागू आहे. हा निर्णय सामान्य प्रशासन विभाग व शासन निर्णय आदिवासी विकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार लागू करण्यात आला. यानुसार, ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार तिनही तालुक्यातील शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. अनुदेय देयबाबत शासनाच्या वित्त विभागाने ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कोणताही बदल केलेला नाही.
२००६ पासून ६ वा वेतन आयोग लागू झाला. ही वाढ लागू झाली असली तरी जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने याचा लाभ केवळ साकोली तालुक्यातील शिक्षकांना देण्यात येत आहे.
लाखांदूर व लाखनी तालुक्यातील शिक्षक या लाभापासून वंचित आहेत. याचा फटका लाखांदूर व लाखनी तालुक्यातील सुमारे ६५० शिक्षकांना फटका बसला आहे. साकोली तालुक्यातील शिक्षकांना दरवर्षी वेतन वाढीप्रमाणे नक्षल भत्त्यात वाढ करण्यात येत असून त्यानुसार वेतन सुध्दा देण्यात येत आहे. याचा लाभ लाखांदूर व लाखनी तालुक्यातील शिक्षकांना मिळत नसल्याने या शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सापत्न वागणुकीबद्दल नाराजी पसरली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी केदार यांची भेट घेतली. यात शिक्षकांच्या नक्षलग्रस्त भत्त्यात होत असलेल्या तफावतीबाबत माहिती देण्यात आली. शिष्टमंडळात भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने, भैय्यालाल देशमुख, संजीव बावणकर, राकेश चिचाये, योगेश कुटे, देवानंद दुबे, संजय खंडाईत, विजय वाघाडे आदी उपस्थित होते. याबाबत मुख्य लेखाधिकारी केदार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Be kind to the teachers about naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.